अकोला : ५० लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:24 AM2020-05-05T10:24:12+5:302020-05-05T10:24:17+5:30
४९ लाख ८१ हजार रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
अकोला : जठारपेठ परिसरात असलेल्या एमजीआर या देशी व विदेशी दारूच्या दुकानात तसेच दुकानावरील गोदामातून अवैधरीत्या साठवणूक केलेला तब्बल ४९ लाख ८१ हजार रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. तब्बल दोन दिवस चाललेल्या या छापेमारीत ५० लाखांचा दारूसाठा जप्त केला
जठारपेठ परिसरातील रहिवासी सचिन महादेवराव राऊत याच्या मालकीचे एमजीआर देशी व विदेशी दारूचे दुकान आहे. या दुकानाच्या परिसरात तब्बल दोन ट्रक देशी व विदेशी दारूचा साठा करण्यात आल्याच्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी सायंकाळी छापा टाकल्यानंतर येथील तब्बल २ ट्रक देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. रविवार व सोमवार असे दोन दिवस या दारूच्या साठ्याची मोजणी झाल्यानंतर तब्बल ४९ लाख ८१ हजार रुपयांचा हा दारूसाठा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सदर दारूसाठा हा सचिन महादेवराव राऊत याचा असल्याचे समोर येताच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईची माहिती देण्यास दिरंगाई
दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्यानंतर प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गत दोन दिवसांपासून कारवाईसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले. दारूची अवैधरीत्या विक्री सुरू असताना एवढी मोठी कारवाई करणे कौतुकास्पद असतानाही सदर विभागाने मात्र प्रचंड गोपनीयता पाळल्याने संशयाची पालवी फुटत आहे.
पोलिसांकडून दीड लाखांची सेटिंग?
उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ५० लाख रुपयांचा दारू साठा ज्या ठिकाणावरून जप्त केला, त्याच ठिकाणावर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी व काही कर्मचाºयांनी छापा टाकला होता; मात्र दारूची एकही बॉटल नसल्याच्या आविर्भावात पोलीस खाली हात परतले होते. या प्रकरणात दीड लाखांची सेटिंग झाल्याची चर्चा पोलिसांच्याच वर्तुळात जोरात आहे.