Akola: धमाल विनोदी सादरीकरणाने अकोलेकरांना खळखळून हसविले; फक्कड लावणीही रंगली !
By संतोष येलकर | Published: March 10, 2024 07:21 PM2024-03-10T19:21:52+5:302024-03-10T19:22:11+5:30
Akola News: 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील दमदार कलावंतांच्या धमाल विनोदी सादरीकरणाने अकोलेकरांना खळखळून हसविले. हास्याचे फवारे आणि महाराष्ट्राची फक्कड लावणीही शनिवारी चांगलीच रंगली. त्यामुळे अकोल्यातील महासंस्कृती महोत्सवाचा पाचवा दिवस अविस्मरणीय ठरला.
- संतोष येलकर
अकोला - 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील दमदार कलावंतांच्या धमाल विनोदी सादरीकरणाने अकोलेकरांना खळखळून हसविले. हास्याचे फवारे आणि महाराष्ट्राची फक्कड लावणीही शनिवारी चांगलीच रंगली. त्यामुळे अकोल्यातील महासंस्कृती महोत्सवाचा पाचवा दिवस अविस्मरणीय ठरला.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग आणि अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित महोत्सवात 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील कलावंतांनी, तसेच प्रसिध्द कलावंत मेधा घाडगे यांनी 'संस्कृती महाराष्ट्राची' हा कार्यक्रम सादर केला. यावेळी प्रामुख्याने आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींची उपस्थिती होती.
प्रसिद्ध मराठी कलावंत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाठ, अंकुर वाळवे, स्नेहल सिद्दम, रोहित चव्हाण या कलावंतांनी उपस्थितांना खळखळून हसविले. हवालदाराच्या भूमिकेत कुशल बद्रिके यांचा व पाठोपाठ गा. तु. उखाणे या भूमिकेत श्रेया बुगडे यांचा मंचावर प्रवेश होताच रसिकांच्या टाळ्यांनी प्रेक्षागृह दणाणून गेले होते.
लावण्यांनी जिंकले रसिकांना;स्थानिक कलावंतांचीही गाणी!
प्रसिध्द कलावंत मेधा घाडगे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या लावण्यांनी रसिकांना जिंकून घेतले. माया शिंदे यांनी सादर केलेली 'अहो शेजारी लई दिसांनी झाली भेट' फक्कडबाज लावणीही मोठी दाद मिळवून गेली.
सिंगर शीलवंत यांनी 'देवा श्रीगणेशा', 'शिवरायांची तलवार' ही गाणी गाऊन रसिकांची दाद मिळवली. नेहा यांनी 'कोंबडी पळाली', 'ही पोर साजूक तुपातली' अशी गाणी सादर करून दाद मिळवली. स्थानिक कलावंतांनीही गाणी सादर केली.