अमरावतीतील सेक्स स्कँडलमध्ये अकोल्याचा आरोपी
By Admin | Published: February 25, 2016 01:41 AM2016-02-25T01:41:09+5:302016-02-27T02:06:49+5:30
देहविक्री करणा-या पाच तरुणींना अटक ; आरोपी बिल्डर अकोल्याचा.
अकोला: देहविक्री व्यवसायातील पाच तरुणींसह एक एजन्ट महिला व अकोल्याच्या एका युवकास बुधवारी सायंकाळी अमरावतीमध्ये अटक करण्यात आली. अकोल्याचा हा आरोपी युवक व्यवसायाने बिल्डर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दोन एजन्ट महिलांनी एक महिन्यापूर्वी अमरावती येथील आनंदवाडी कॉलनीत एका तीन मजली अपार्टमेंटमध्ये भाडेतत्वावर फ्लॅट घेतला. तेथे पाच तरुणींमार्फत देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. हा प्रकार काही दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला होता. देहविक्री होत असल्याची माहिती पोलीस विभागाला दोन दिवसांपूर्वीच मिळाल्याने पोलिसांनी आनंदवाडी परिसरातील या फ्लॅटवर लक्ष केंद्रीत केले. देहविक्री होत असल्याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पंटरला ग्राहक बनवून फ्लॅटमध्ये पाठविण्यात आले. या पंटरने महिलेशी संवाद साधून एका तरुणीची निवड केली. त्यानंतर तो फ्लॅटमध्ये शिरला. याबाबत पंटरने पोलिसांना माहिती देताच पोलिसांचा ताफा फ्लॅटमध्ये शिरला. फ्लॅटमध्ये अतुल काशीराव इंगळे (वय ३५, रा. अकोला) या तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तसेच पाच तरुणी व एक एजन्ट महिलेलासद्धा फ्लॅटमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींजवळून १५00 रुपये रोख जप्त केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी परिसरातील बघ्यांनी गर्दी केली होती. सातही जणांना पोलिसांनी पोलीस आयुक्तालयात नेऊन, तेथे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये आणखी एका एजन्ट महिलेचे नाव समोर आले असून, तिनेही फ्लॅट भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेने पाच तरुणी, दोन एजन्ट महिला व अतूल इंगळेला गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. दुसर्या महिला एजन्टचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध ३,४,५, पीटा अँक्ट व भादंविच्या कलम ३७0, २,३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. गाडगेनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.