Akola: पाणीटंचाई निवारणासाठी ३७ गावांत ४० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By संतोष येलकर | Published: March 29, 2024 07:32 PM2024-03-29T19:32:52+5:302024-03-29T19:33:30+5:30
Akola News: अकोला जिल्हयातील अकोट, अकोला व बार्शिटाकळी या तीन तालुक्यांतील ३७ गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी ४३ लाख ३९ हजार रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या ४० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी २२ मार्च रोजी दिला.
- संतोष येलकर
अकोला - जिल्हयातील अकोट, अकोला व बार्शिटाकळी या तीन तालुक्यांतील ३७ गावांत पाणीटंचाइ निवारणासाठी ४३ लाख ३९ हजार रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या ४० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी २२ मार्च रोजी दिला. त्यामुळे संबंधित गावांतील पाणीटंचाइ निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.तापत्या उन्हासोबतच जिल्हयातील विविध भागात पाणीटंचाइची समस्या जाणवू लागली असून, पिण्याच्या पाण्यासाठी टंचाइग्रस्त गावांत ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन महिन्यांपूर्वी मंजूरी देण्यात आली आहे. आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता दिली जात आहे. त्यानुसार जिल्हयातील अकोट, अकोला व बार्शिटाकळी या तीन तालुक्यातील ३७ गावांत ४० विंधन विहिरींच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने संबंधित गावांमध्ये पाणीटंचाइ निवारणासाठी ४० विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी दिला.
३७ गावांत मान्यता दिलेली अशी आहेत विंधन विहिरींची कामे !
तालुका गावे विंधन विहिरी
अकोला २२ २४
अकोट ०५ ०५
बार्शिटाकळी १० ११
कामे पूर्ण करा; ग्रामस्थांना पाण्याची टंचाइ भासू नये !
प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली संबंधित ३७ गावांतील ४० विंधन विहिरींची कामे येत्या १५ एप्रिलपर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करुन, त्याव्दारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सरु करण्याचे सांगत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाइ भासणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी कुंभार यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह संबंधित यंत्रणांना दिले आहेत.