अकोला आगाराला मिळाल्या आठ नव्या बस
By Atul.jaiswal | Published: April 15, 2023 05:16 PM2023-04-15T17:16:47+5:302023-04-15T17:19:56+5:30
ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या आरामदायक बसना मिळणारा प्रतिसाद पाहता आता एसटी महामंडळाने सर्वच विभागांना आरामदायक बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत स्पर्धा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यातील सर्व विभागांना नव्या आरामदायक बस देण्यात येत आहेत. याच अनुषंगाने अकोला क्र. २ आगाराला आठ नव्या बस मिळाल्याने अकोलेकर प्रवासी एसटी बसमध्येच खासगी बससारखा आरामदायक प्रवास करत आहेत.
ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या आरामदायक बसना मिळणारा प्रतिसाद पाहता आता एसटी महामंडळाने सर्वच विभागांना आरामदायक बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला विभागातील अकोला क्र. २ आगाराच्या वाट्याला १० बस आल्या असून, आतापर्यंत यापैकी आठ बसेसचा ताबा देण्यात आला आहे. या नव्या बसगाड्या बी. एस. ६ मानक असलेल्या असून, त्यांची रंगसंगती व रचना खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांसारखी करण्यात आली आहे. १२ मीटर लांब असलेल्या या बसेस दिसायला आकर्षक आहेत. आणखी दोन बसेसचा ताबा येत्या दोन दिवसांत मिळणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्या मार्गावर धावताहेत बस
अकोला क्र. २ ला मिळालेल्या आठ बसगाड्या लांब पल्ल्यासाठी सोडण्यात येत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकावरून अकोला ते पुणे, अकोला ते नागपूर, अकोला ते परभणी या मार्गावर नव्या बस चालविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.