अकोला-अकोट ब्रॉडगेजची उद्या चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 04:51 PM2020-07-22T16:51:51+5:302020-07-22T16:51:59+5:30
अकोला ते अकोट दरम्यानच्या ब्रॉडग्रेज मार्गाची चाचणी २३ व २४ जुलै रोजी होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोला ते खांडवा या रेल्वेमार्गाचा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून प्रस्तावित असलेल्या ब्रॉडगेज परिवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटला असताना आता अकोला ते अकोट दरम्यानच्या ब्रॉडग्रेज मार्गाची चाचणी २३ व २४ जुलै रोजी होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
अकोला ते अकोटपर्यंतचा ४५ किमी लांबीच्या पट्ट्याचे ब्रॉडगेज परिवर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. अकोला ते खंडवा मार्गाचे गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुद्यावरून रखडलेले असताना आता दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला ते अकोटपर्यंतचा मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. आता पुढचा भाग म्हणून अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा दौरा निश्चित झाल्याची माहिती आहे. गुरुवार २३ व शुक्रवार २४ जुलै रोजी या मार्गावर विशेष गाडी चालवून चाचणी घेतली जाणार आहे. अकोला ते गांधी स्मारक, गांधी स्मारक ते पाटसूल, पाटसूल ते अकोट व परत अकोलापर्यंत अशा टप्प्यांमध्ये दोन दिवस ही चाचणी होणार आहे. मोटार ट्रॉली व विशेष गाडी अशा दोन्ही चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वेगवान दौडचीही होणार चाचणी
नव्याने टाकण्यात आलेल्या या मार्गाची क्षमता तपासण्यासाठी शुक्रवार २४ जुलै रोजी या मार्गावरून ताशी १२० किमी वेगाने गाडी नेऊन चाचणी घेतली जाणार आहे. विशेष चाचणी गाडी अकोट येथून १२.१५ ला सुरू होऊन १ वाजता अकोला येथे पोहोचेल, असे सूत्रांनी सांगितले.