Akola: चिंताजनक! अकोला जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांत २६ दिवसांपासून पाऊसच नाही
By रवी दामोदर | Published: September 5, 2023 06:26 PM2023-09-05T18:26:32+5:302023-09-05T18:26:58+5:30
Akola: पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर असून, शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९ महसूल मंडळात दि.२५ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत अशा २६ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याचे वास्तव आहे.
- रवी दामोदर
अकोला - पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या वाटेवर असून, शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९ महसूल मंडळात दि.२५ जुलै ते ५ सप्टेंबरपर्यंत अशा २६ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याचे वास्तव आहे. त्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ घोषित करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
जिल्ह्याचे तापमान ३५.६ अंशांवर गेले असल्याने पिके करपणे सुरू झाली आहेत. त्यामुळे बहरलेल्या पिकाची वाटचाल आता दुष्काळाकडे चालली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंतेचे ढग दाटले आहेत. यंदाच्या खरिपात जिल्ह्यात ४.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१ टक्के पाऊस बरसला असून, तब्बल ३९ टक्के पावसाची तूट आहे.
तापमान ३६.२ अंशांवर, पिके करपण्यास सुरुवात
जुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्यात पावसाचा प्रदीर्घ खंड राहिला आहे. पावसाचा खंड असल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यात सप्टेंबर महिन्याला सुरुवात होताच तापमानातही वाढ झाली असून, पिकांनी माना टाकल्या आहेत. काही भागांत पिके करपण्यास सुरुवात झाली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ३६.२ अंशांवर असून, दुपारच्या सुमारास जिवाची लाही-लाही झाली.