Akola: ...अन् अचानक घरच हलल्यासारखे वाटले, अकोल्यात सौम्य भूकंप, नागरिकांना जाणवले धक्के
By Atul.jaiswal | Published: July 10, 2024 07:29 PM2024-07-10T19:29:55+5:302024-07-10T19:30:15+5:30
Akola News: बुधवारी सकाळची वेळ...कुणी चहा पित होते, कुणी पेपर वाचत होते, तर कुणी मुलांना शाळेत घेऊन जाण्याच्या तयारीत होते...अशी दिनचर्या सुरू असतानाच अचानक सात-सव्वा सात वाजताचे सुमारास काही जणांना आपले घर किंचितसे हलल्याची जाणीव झाली.
- अतुल जयस्वाल
अकोला - बुधवारी सकाळची वेळ...कुणी चहा पित होते, कुणी पेपर वाचत होते, तर कुणी मुलांना शाळेत घेऊन जाण्याच्या तयारीत होते...अशी दिनचर्या सुरू असतानाच अचानक सात-सव्वा सात वाजताचे सुमारास काही जणांना आपले घर किंचितसे हलल्याची जाणीव झाली. अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आणि सर्वांनीच मग आपल्यालाही धक्के जाणवल्याचे इतरांना सांगितले व संपूर्ण शहरभर भूकंपाची चर्चा सुरू झाली.
बुधवार, १० जुलै रोजी सकाळी ७:१५ वाजता नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तिथे भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली असली तरी अकोल्यात अगदी सौम्य प्रमाणात धक्के जाणवले. तज्ज्ञांचे मते ही तीव्रता एक ते दीड रिश्टर स्केलपेक्षाही कमी असावी. अकोला शहरातील जुने शहर, शिवणी, रणपिसेनगर, खेडकर नगर, सुधीर काॅलनी, सावंतवाडी, गंगानगर आदी भागांतील नागरिकांना जमीन हादरल्याचा अनुभव आला. बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा प्रकल्प परिसरातील महानसह अनेक गावांत भूकंपाच्या सौम्य धक्क्याचा अनुभव आल्याचे नागरिकांनी सांगितले.
उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना जाणवले धक्के
अकोला शहरातील विविध भाग व जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला. तीव्रता अत्यंत कमी असल्याने सर्वांनाच भूकंपाचे धक्के जाणवले नाही. शहरातील अपार्टमेंटमध्ये तळ मजल्याच्या तुलनेत वरच्या मजल्यांवर राहणाऱ्यांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरिक सांगतात.
यापूर्वीही जाणवले धक्के
अकोल्यात भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. शहरासह जिल्ह्यात यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. २७ मार्च २०२४ रोजी बाळापूर तालुक्यातील अंतरी मलकापूर येथे भूकंपाचा धक्का बसला होता. त्यापूर्वी वर्ष २०२३ मध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. वर्ष २०२० मध्येही जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता.
सकाळी मुलीच्या शाळेची तयारी करत असताना अचानक संपूर्ण फ्लॅट किंचितसा हलल्याची जाणीव झाली. शेजारी विचारले असता त्यांनीही असाच अनुभव आल्याचे सांगितले. त्यामुळे थोडी भीती वाटली होती.
- शीतल ठाकरे, अकोला
आम्ही चौथ्या मजल्यावर राहतो. सकाळी दैनंदिन कामात असताना अचानक हलल्यासारखे वाटले. बाहेर पडून शेजाऱ्यांना विचारले असता त्यांनाही असाच अनुभव आल्याचे सांगितले. नंतर हा भूकंपाचा धक्का होता हे समजले.
- ॲड. वैशाली भोरे, अकोला
भूगर्भातील हालचालींचा हा परिणाम आहे. अलीकडच्या काळात वाढलेल्या उत्खननामुळे भूगर्भात पोकळी निर्माण झाल्याने टेक्टॉनिक प्लेटच्या हालचाली वाढल्या आहेत. आपला भाग हा मुळीच भूकंप प्रवण नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
- प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला