कोरोनाचा आणखी एक बळी; ५१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:39 PM2020-10-17T12:39:11+5:302020-10-17T12:39:44+5:30
CoronaVirus in Akola आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २६४ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. शनिवार, १७ आॅक्टोबर रोजी आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २६४ झाली आहे. दरम्यान, ५१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८०३४ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील वारखेड येथील आठ, मूर्तिजापूर, मलकापूर व गायगोळे प्लॉट येथील प्रत्येकी पाच, जीएमसी येथील तीन, तेल्हारा, बाळापूर, जीएमसी हॉस्टेल व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, समर्थ नगर, हिवरखेड, देशमुख फाईल, खडकी, पातूर, आदर्श कॉलनी, प्रतापनगर, संतोष नगर, रतनलाल प्लॉट, विद्युत कॉलनी, मोठी उमरी, व्यंकटेश नगर, रमेश नगर, शिवाजी नगर, डाबकी रोड, खदान व लेडी हार्डिंग येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
मलकापूरातील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
शनिवारी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण व्हीएचबी कॉलनी, मलकापूर येथील ७२ वर्षीय पुरुष असून, त्यांना १६ आॅक्टोंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
४७० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,०३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३०० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४७० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.