‘ई-नाम’ योजनेचा फज्जा; बोली पद्धतीतूनच लिलाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:49 AM2020-10-06T10:49:52+5:302020-10-06T10:50:21+5:30
Akola APMC, Agriculture Sector बाजार समितीमधील ई-नाम योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे पारंपरिक बोली पद्धतीने होणारे लिलाव बंद करून त्याऐवजी शेतमालाच्या आॅनलाइन लिलावासाठी ‘ई-नाम’ पोर्टल तयार करण्यात आले; मात्र या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचे वास्तव आहे.
केंद्र सरकारने २०१६ पासून राष्ट्रीय कृषी बाजार ही योजना सुरू केली. बाजार समित्यांमधील शेतमालाचे पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाइन लिलावासाठी ई-नाम हे व्यापारी पोर्टल तयार करण्यात आले व कृषी उत्पन्न बाजार समित्या या पोर्टलशी जोडण्यात आल्या. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४५ ते ५० टक्के शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार आॅनलाइन लिलावाद्वारे होत असले तरी, ५० ते ५५ टक्के शेतमाल शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच होत असल्याचे वास्तव आहे.
शेतमालाच्या आॅनलाइन खरेदी-विक्री व्यवहारासाठी शेतकऱ्यांसह व्यापारी व अडत्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बाजार समितीमधील ई-नाम योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
ई-नाम योजना अंतर्गत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४५ ते ५० टक्के शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. उर्वरित ५० ते ५५ टक्के शेतमाल खरेदी -विक्रीचे व्यवहार पारंपरिक बोली पद्धतीच्या लिलावातूनच होतात. आॅनलाइन लिलावाद्वारे शेतमाल खरीदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात शेतकऱ्यांसह व्यापारी व अडत्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
- शिरीष धोत्रे
सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती