अकोला : समता कॉलनीतील देहव्यापार अड्डय़ावर धाड; चार महिलांसह सहा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:12 PM2017-12-19T23:12:16+5:302017-12-19T23:27:59+5:30
अकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन मंगळवारी धाड टाकली. या ठिकाणावरून चार महिलांसह एक ग्राहक व घर भाड्याने घेणार्या सुरेश गांधी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन मंगळवारी धाड टाकली. या ठिकाणावरून चार महिलांसह एक ग्राहक व घर भाड्याने घेणार्या सुरेश गांधी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
समता कॉलनीतील एक आलिशान बंगला सुरेश राधाकिसन गांधी याने भाड्याने घेतला होता. सदर बंगल्यात गांधी चार महिलांकडून देहव्यापार करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या, खदान पोलिसांनी या देहव्यापार अड्डय़ावर पाळत ठेवून मंगळवारी एक फंटर ग्राहक आणि त्याच्यासोबत एका पोलीस कर्मचार्यास ग्राहक म्हणून पाठविले. या दोघांना एक हजार रुपयांची मागणी झाल्यानंतर त्यांनी दबा धरून असलेल्या पोलिसांना इशारा देताच खदान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या ठिकाणावरून सुरेश राधाकिसन गांधी, एक ग्राहक आणि चार महिलांना ताब्यात घेतले. या चार महिलांमध्ये एका महिलेचे वय ५३ असून, दुसरीचे ४५ आहे, तर तिसर्या महिलेचे ३५ वय असून, चौथी महिला २३ वर्षांची आहे. या चारही महिलांना त्यांच्या पतीने सोडले असल्याची माहिती असून, त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी कारवाई केल्यानंतर महिलांना ताब्यात घेतले आहे. या चार महिलांसह सुरेश गांधी व ग्राहकाविरुद्ध पीटा कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सुरेश गांधीचे ५00 रुपये कमिशन
या बंगल्यात आणल्यानंतर ग्राहकाकडून एक हजार रुपये घेण्यात येत होते. यामधील केवळ ५00 रुपये महिलांना देऊन ५00 रुपयांचे कमिशन स्वत: सुरेश गांधी ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे. गत अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू असल्याचेही समोर आले आहे.
आक्षेपार्ह साहित्य जप्त
समता कॉलनीतील या बंगल्यातून पोलिसांनी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. यामध्ये मोबाइल काही सीडी व रोख रक्कम असून, या मुद्देमालाची किंमत ६५ हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आक्षेपार्ह साहित्य जप्त करीत असतानाच एका खोलीत एक ग्राहकही पोलिसांना नको त्या अवस्थेत आढळला.
नागरिकांनी केल्या तक्रारी
या परिसरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई के ली.