पश्चिम भारत ज्युनिअर’ बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंची १५ पदकांची कमाई
By रवी दामोदर | Published: March 12, 2024 05:39 PM2024-03-12T17:39:41+5:302024-03-12T17:40:34+5:30
चार सुवर्ण, नऊ रजत व दोन कांस्य पदकांवर कोरले नाव, महाराष्ट्र संघाचे केले प्रतिनिधीत्व.
रवी दामोदर, अकोला : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या ‘पश्चिम भारत ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये अकोला क्रीडा प्रबोधनीच्या खेळाडूंनी सहभाग घेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले. स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून खेळाडूंनी १५ पदकांची कमाई केली. त्यामध्ये चार सुवर्ण, नऊ रजत व दोन कांस्य पदकांचा समावेश आहे.
बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया, वेस्ट झोन बॉक्सिंग काऊंन्सिल, गुजरात बॉक्सिंद असोशिएशनद्वारा अहमदाबाद येथे ‘पश्चिम भारत सब ज्युनिअर’ बॉक्सिंग स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र संघामध्ये अकोला क्रिडा प्रबोधनीच्या खेळाडूंनी स्थान मिळविलेले असल्याने त्यांनी स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व केले. स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून वैभव दामोदर, पार्थ चोपडे, गार्गी राऊत, सास्वत महल्ले या खेळाडूंनी सुवर्ण पदक प्राप्त केले. तर, वैभव चव्हाण, सार्थक हिवराळे, कृतिका वानखडे, इशा झामरे आदींसह नऊ खेळाडूंनी दुसरे स्थान मिळविले. तर अदनान शाह याच्यासह दोघांनी कांस्य पदक प्राप्त केले.
या सर्व खेळाडूंनी आंतराष्ट्रीय प्रशिक्षक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे. स्पर्धेमध्ये प्रशिक्षक म्हणून राकेश मांझी, संघ व्यवस्थापक कमलेश भरडे यांनी काम पाहिले.