Akola: अतिक्रमकांसमाेर महापालिकेचे लाेटांगण; दुसऱ्यांदा दिली मुदत, २१ ऑगस्ट पासून माेहीमेला करणार प्रारंभ
By आशीष गावंडे | Published: August 19, 2023 07:52 PM2023-08-19T19:52:08+5:302023-08-19T19:54:04+5:30
Akola: शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत.
- आशिष गावंडे
अकोला - शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण माेहीम सुरु करण्याचा गवगवा करणाऱ्या मनपा प्रशासनाने आता नागरिकांना स्वत:हून अतिक्रमण हटविण्यासाठी दुसऱ्यांदा मुदत दिली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वैतागलेल्या अकाेलेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांलगत रेडीमेड ड्रेस विक्रेता, खाद्यपदार्थ विक्रेता,भाजीपाला व्यावसायिक व इतर किरकाेळ साहित्य विक्री करणाऱ्या लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांनी अक्षरश: बाजार मांडला आहे. यामुळे चारचाकी व दुचाकी चालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असून पादचारी अकाेलेकरांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या समस्येवर प्रभावी ताेडगा काढण्याची गरज असताना महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. कंत्राटदारांची देयके तातडीने अदा करणाऱ्या प्रशासनाकडून विकास कामांची पाहणी केली जाते. दुसरीकडे अतिक्रमणाच्या समस्येचा नागरिकांना वैताग आला असताना कारवाइसाठी वरिष्ठ अधिकारी दालनात बसणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे. अर्थात, सर्वसामान्यांना टॅक्सचा भरणा करण्यासाठी आग्रही असणारे प्रशासन अतिक्रमणाच्या मुद्यावर संभ्रमावस्थेत असल्यामुळे नागरिका तिव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
२१ ऑगस्ट पासून कारवाइला सुरुवात
लघू व्यावसायिक, फेरीवाले व दुकान व्यावसायिकांनी उभारलेले अतिक्रमण स्वत:हून न हटविल्यास मनपा प्रशासनाकडून २१ ऑगस्ट पासून अतिक्रमण हटविण्याची कारवाइ केली जाणार आहे. यामध्ये पूर्व, पश्चिम, आणि उत्तर झोन अंतर्गत अशोक वाटीका ते पीकेव्ही पुल पर्यंत, नेहरू पार्क ते दुर्गाचौक, पोस्ट ऑफीस ते सुधीर कॉलनी पर्यंत, सिटी कोतवाली ते जयहिंद चौक ते किल्ला चौक ते वाशिम बायपास, आकोट फैल परिसर, साधना चौक तसेच पालखी मार्गापर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे.
सणासुदीच्या नावाखाली अतिक्रमकांना अभय
सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल राहते. यामुळे उद्याेग,व्यवसायाला चालना मिळत असल्याचा युक्तीवाद लघू व्यावसायिक व फेरीवाले करतात. त्यांची पाठराखण करण्यासाठी राजकीय पुढारीही समाेर येतात. परिणामी सणासुदीच्या नावाखाली अतिक्रमकांना अभय मिळत असले तरी रस्त्यातून वाट काढताना अकाेलेकरांच्या नाकीनऊ येत आहेत.