Akola: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर अॅट्रासिटीचा गुन्हा, जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या कक्षात घडला प्रकार
By आशीष गावंडे | Published: July 13, 2024 07:55 PM2024-07-13T19:55:20+5:302024-07-13T19:55:35+5:30
Akola News: अकाेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या दालनात शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार एका महिला सरपंचने सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात दिली.
- आशिष गावंडे
अकाेला - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या दालनात शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार एका महिला सरपंचने सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी पाेलिसांनी जिल्हाप्रमुख दातकर यांच्या विराेधात अॅट्रासिटीचा गुन्हा केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या दहिहांडा सर्कलमध्ये घरकुलसाठी पात्र असलेल्या ओबीसी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याच्या मुद्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेता गाेपाल दातकर यांनी ११ जुलै राेजी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या दालनात उपमुख्यकार्यकारी अधिकारी परिहार, गटविकास अधिकारी रुद्रकार,हिंगणी बु.गावच्या ग्रामसेविका राेशनी माेरे यांना चर्चेसाठी बाेलावले हाेते. यावेळी ग्राम हिंगणी बु.येथील अनेक महिला व पुरुषही उपस्थित हाेते. बैठक सुरु हाेण्यापूर्वी जि.प.‘सीइओ’कामानिमीत्त बाहेर निघून गेल्या. यादरम्यान, ‘सीइओं’च्या कक्षात महिला सरपंच दाखल झाल्या. गाेपाल दातकर घरकुलाच्या मुद्यावर अधिकाऱ्यांसाेबत चर्चा करीत असताना महिला सरपंच व दातकर यांच्यात शाब्दीक वाद झाल्याची माहिती आहे. १२ जुलै राेजी संबंधित महिला सरपंच यांनी सिटी काेतवाली पाेलिस स्टेशन गाठत गाेपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार नाेंदवली. याप्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांनी दातकर यांच्या विराेधात १३ जुलै राेजी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम २९६, ३५२, ३५१(३), ३(१)(आर),अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३(१)(एस),३(२)(व्हीए)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषद सर्कलमधील प्रलंबित घरकुलाच्या मुद्यावर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक सुरु हाेती. बैठकीचे निमंत्रण नसताना महिला सरपंच आतमध्ये आल्या व अधिकाऱ्यांच्या समक्ष माझ्याशी वाद घातला. त्यांनी दिलेल्या तक्रारीची पाेलिसांनी शहानिशा करावी,ही अपेक्षा आहे.
- गाेपाल दातकर, जि.प.गटनेता तथा जिल्हाप्रमुख सेना