अकोला वकील संघाकडून रुग्ण व नातेवाईकांना भोजनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:36+5:302021-07-05T04:13:36+5:30
न्यायालयाच्या आवारातच बनवतात भोजन सचिन राऊत अकोला : कोरोनाच्या भीषण संकटामुळे प्रत्येक जण आर्थिक विवंचनेत आलेला आहे. यामधून वकीलही ...
न्यायालयाच्या आवारातच बनवतात भोजन
सचिन राऊत
अकोला : कोरोनाच्या भीषण संकटामुळे प्रत्येक जण आर्थिक विवंचनेत आलेला आहे. यामधून वकीलही सुटले नाहीत. तरी आर्थिक अडचणीत असताना त्यांनी मानवधर्म जोपासत जिल्हा स्त्री रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी रोज सायंकाळी भोजनाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या ठिकाणच्या ४०० ते ५०० रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मसाला खिचडी, पुरी भाजी व विविध खाद्य पदार्थांचे वाटप वकील संघ रोज सायंकाळी करीत आहे.
अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश जाधव यांच्यासह अकोला बार असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्य मिळून संकटात सापडलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तसेच कडक निर्बंधात त्रास होऊ नये तसेच त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रोज सायंकाळी अकोला न्यायालयाच्या आवारात विविध खाद्यपदार्थ स्वतः बनवून ते रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम तीन महिन्यांपासून अविरतपणे करत आहेत. त्यामुळे हजारो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा त्रास वाचला असून, त्यांना या कोरोनाच्या काळात आधार मिळाला आहे. ऑटो, बस सेवा, रेल्वे सेवा बंद असल्याने प्रत्येकाला वाहतुकीसाठी सोयीचे साधन नसल्याने जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे वकील संघाने हा अनोखा उपक्रम राबवून अनेकांना आधार दिला आहे. या उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
न्यायाधीशांनीही घेतला पुढाकार
अकोला वकील संघाने राबविलेल्या या उपक्रमासाठी न्यायाधीशांनीही पुढाकार घेऊन भोजनासाठी मदत केली. अकोला वकील संघासोबतच अकोला जिल्हा व सत्र न्यायालयातील तसेच प्रथम श्रेणी न्यायालयातील न्यायाधीशांनी या उपक्रमासाठी आर्थिक व स्वतः हजर राहून मदत केली. त्यामुळे न्यायाधीशांनी या काळात मानव धर्म जोपासल्याचे दिसून येत आहे.
वकील संघातील यांनी घेतली जबाबदारी
अकोला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेश जाधव यांच्यासह ॲड. अनुप देशमुख, ॲड. संगीता भाकरे, ॲड. सौरभ शर्मा, ॲड. धीरज शुक्ला, ॲड. महेंद्र शहा, ॲड. राजेश देशमुख, ॲड. दिलदार खान, ॲड. चंद्रकांत वानखडे, ॲड. दिनेश खुरानिया, ॲड. अनिस शहा, ॲड. रविकांत ठाकरे, ॲड. विद्याधर सरकटे, ॲड. देवेन अग्रवाल, ॲड. सुमित बजाज, ॲड. रवींद्र पोटे, ॲड. अखिल मिश्रा, ॲड. अतुल सराग, ॲड. प्रशांत ठाकरे, ॲड. शिवम शर्मा, ॲड. पवनेश अग्रवाल, ॲड. कोठारी, ॲड. व्यास, ॲड. शोएब, ॲड. भिसे, ॲड. कमल आनंदानी आदी पदाधिकाऱ्यांनी भोजनदान उपक्रमातील भोजन बनविणे आणि ते वाटप करण्यासाठी जबाबदारी घेतली.