अकोला : नववर्षाचा जल्लोष करून परतताना दुचाकी खांबावर आदळली; एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:49 AM2018-01-02T01:49:01+5:302018-01-02T01:51:22+5:30
गोरेगाव खु. : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणार्या युवकांची दुचाकी विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री गोरेगाव खुर्दनजीक घडली. शिरीष विश्वासराव तायडे रा. गोरेगाव असे मृतक तरुणाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील काही तरुणांनी ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त गावानजीकच्या शेतात पार्टी आयोजित केली होती. गावातीलच आदित्य तिडके यांच्या शेतात न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी रंगली. या पार्टीत शिरीष तायडे हा रत्नदीप तायडे व रोहन तायडे या आपल्या सैन्यातील मित्रांसोबत सहभागी होण्यासाठी मोटारसायकलवरून गेला. मध्यरात्रीपर्यंत पार्टी केल्यानंतर घराकडे परत येत असताना रत्नदीप मोटारसायकल चालवित होता. मन्साराम तिखिले यांच्या शेताजवळच्या वळणावर रत्नदीपचे नियंत्रण सुटले व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये शिरीष तायडे हा जागीच मृत्युमुखी पडला.
या अपघातात रत्नदीप तायडे हा देखील जखमी झाला. यावेळी त्यांच्यासोबतच घरी परत येत असलेल्या मुकेश तायडे, सचिन तायडे, गोलू मुंडे यांनी शिरीष तायडे याला अकोला येथे रुग्णालयात आणले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरीष हा विश्वासराव तायडे यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.