अकोला :महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने; उपमहापौरपदी राजेंद्र गिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 07:04 PM2019-11-22T19:04:07+5:302019-11-22T19:04:19+5:30
महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय झाल्याचे पहावयास मिळाले.
अकोला:महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना मसने तसेच उपमहापौर पदासाठी राजेंद्र गिरी यांचा विजय झाला. या दोन्ही उमेदवारांना ८० पैकी ४८ मते मिळाली. मनपाच्या मुख्य सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय झाल्याचे पहावयास मिळाले. या निवडणुकीत शिवसेना तटस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसंचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने विरोधी पक्ष काँग्रेसने एकाकी लढा दिल्याचे समोर आले.
महापौर पदाच्या सोडतीत अकोला महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले होते. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी मनपातील सत्ताधारी भाजपच्यावतीने महापौर पदासाठी अर्चना मसने व उपमहापौर पदासाठी राजेंद्र गिरी यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले होते. शुक्रवारी मनपाच्या मुख्य सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली असता महापौर पदासाठी अर्चना मसने विजयी झाल्या. सभागृहात एकूण ८० नगरसेवकांपैकी भाजपचे ४८ नगरसेवक असून एका अपक्ष नगरसेविकेचा भाजपला पाठींबा होता. या निवडणुकीत भाजपची एक नगरसेविका अनुपस्थित असली तरीही अर्चना मसने यांना ४८ नगरसेवकांची मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार अजरा नसरीन मकसूद खान यांना काँग्रेसच्या सर्व १३ नगरसेवकांची मते मिळाली.