अकोला : ११० कोटींच्या विकास कामांना ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 04:01 PM2019-09-21T16:01:58+5:302019-09-21T16:02:03+5:30
जिल्ह्यातील ११० कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतील विविध विकास कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.
अकोला : आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११० कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीतील विविध विकास कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते, इतर जिल्हा मार्ग, जनसुविधा अंतर्गत कामे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे, मृद व जलसंधारण, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत विकास कामे, नगरोत्थान योजनेंतर्गत कामे, प्राथमिक शाळा इमारतींची बांधकामे, प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र इमारतींचे बांधकाम व देखभाल-दुरुस्ती, अंगणवाडीची बांधकामे, यात्रा स्थळांचा विकास, ऊर्जा विकास व इतर विकास कामे प्रस्तावित आहेत. मंजूर निधीपैकी संबंधित विभागांमार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार आॅगस्ट अखेरपर्यंत ४८ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ११० कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीची कामे मार्गी लागणे अद्याप बाकी आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन विकास कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११० कोटी ७६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांना ‘ब्रेक ’ लागणार आहे.