अकोला : गुंगीचे औषध फवारून १.३० लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:09 PM2018-08-24T13:09:35+5:302018-08-24T13:11:48+5:30
नझीर मोहम्मद खान यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी गुंगीचे औषध फवारून सुमारे १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे.
अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युसूफ अली चौकात रहिवासी असलेल्या नझीर मोहम्मद खान यांच्या घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी गुंगीचे औषध फवारून सुमारे १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
युसूफअली चौकातील इंद्रायणी नगरमध्ये नझीर मोहम्मद वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी लग्नकार्य असल्याने येणाऱ्या-जाणाºयांची गर्दी झाली होती. याच संधीचे सोने करीत अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या अंगावर गुंगी आणणारे औषधाचा फवारा केला. त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक यामुळे गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या घरातील २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, ३० हजारांचे सोने, तसेच नगदी ८० हजार रुपये, असा एकूण सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. गुरुवारी पहाटे नझीर यांना जाग आली असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी थेट अकोट फैल पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजू भारसाकळे करीत आहेत.