अकोला मनपाची पुन्हा मुसंडी; शहरातील अतिक्रमणावर हल्लाबोल
By admin | Published: July 3, 2014 01:27 AM2014-07-03T01:27:38+5:302014-07-03T01:41:16+5:30
अकोला जुने शहर, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन चौकातील अतिक्रमणाचा सफाया.
अकोला: शहरातील अतिक्रमणाचा सफाया करण्याच्या उद्देशातूनच बुधवारी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत अतिक्रमणाच्या समस्येचा बिमोड केला. एकाच दिवशी टॉवर चौक, जुने शहर व रेल्वे स्टेशन चौकातील अतिक्रमण काढले.
शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढल्यानंतर दुसर्या दिवशी त्या भागात पुन्हा अतिक्रमण थाटले जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सतत सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने केला. टॉवर चौकातील अतिक्रमित दुकाने काढल्यानंतर शास्त्री स्टेडियमलगत अतिक्रमकांनी डोके वर काढले होते. गायी-म्हशींचे गोठे, शेणाचे व मातीचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. ही बाब समोर येताच आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी संपूर्ण ताफ्यानिशी टॉवर चौक परिसर, शास्त्री स्टेडियममधील गाळेधारकांची तपासणी केली.
यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंग जाधव, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व इतर अधिकारी उपस्थित होते. मोकळ्य़ा केलेल्या जागेचा अकोलेकरांना उपयोग व्हावा याकरिता सामाजिक संघटना, इच्छुक नागरिकांनी मदतीसाठी समोर येण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.