अकोला मध्यवर्ती बसस्थानक अमरावती प्रदेशात प्रथम, १० लाखांचे बक्षीस
By Atul.jaiswal | Updated: June 26, 2024 17:08 IST2024-06-26T17:07:46+5:302024-06-26T17:08:29+5:30
ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते.

अकोला मध्यवर्ती बसस्थानक अमरावती प्रदेशात प्रथम, १० लाखांचे बक्षीस
अकोला : एसटी महामंडळाने घेतलेल्या "हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे " स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अमरावती प्रदेशात 'अ' वर्गामध्ये अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकाचा (अकोला आगार क्र. २) प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला १० लाख रुपयांच बक्षीस मिळाले आहे. मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून १मे,२०२३ ते ३० एप्रिल, २०२४ या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर "हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे " स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविले गेले.
ही स्पर्धा राज्यभरातील ५६३ बसस्थानकांवर घेण्यात आली असून, या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. यामध्ये अमरावती प्रदेशात 'अ' वर्गामध्ये' ७० गुण मिळविणाऱ्या अकोला मध्यवर्ती बसस्थानकाने पहिला क्रमांक पटकावला. येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मु्ल्यांकनातील गुणांच्या आधारे निवड
अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे.
तेल्हारा बसस्थानकाला तृतीय क्रमांक
या अभियानांतर्गत 'ब' वर्गामध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा बसस्थानकाचा अमरावती प्रदेशात तिसरा क्रमांक आला आहे. या बसस्थानकाला १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.