अकोला : रेल्वे रुळाजवळच्या अतिक्रमकांना मध्य रेल्वेची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:13 PM2018-03-10T15:13:24+5:302018-03-10T15:13:24+5:30
अकोला : रेल्वे बांधकाम विभागाच्यावतीने रेल्वेच्या शहराच्या सीमावर्तीय भागात आवार भिंत बांधण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळाभोवती निवास करून राहणाऱ्यांना मध्य रेल्वे विभागाने नोटीस पाठविल्या आहेत.
अकोला : रेल्वे रुळाजवळ अतिक्रमण करून राहणाऱ्या शेकडो नागरिकांना सेंट्रल रेल्वे विभागाने नोटीस बजाविली आहे. रेल्वे बांधकाम विभागाच्यावतीने रेल्वेच्या शहराच्या सीमावर्तीय भागात आवार भिंत बांधण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळाभोवती निवास करून राहणाऱ्यांना मध्य रेल्वे विभागाने नोटीस पाठविल्या आहेत.
तार फैल परिसरात रेल्वे रुळालगत अतिक्रमण करून राहणाऱ्या शेकडो नागरिकांना मध्य रेल्वे विभागाच्या नोटीसेस मिळाल्याने खळबळ माजली आहे. गत अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे राहणाऱ्या या लोकांना नोटीस मिळाल्याने आता या वसाहतीमधील लोकांनी राजकीय पुढाऱ्यांकडे धाव घेतली आहे. रेल्वेच्या जागेवर विना परवाना ताबा घेतलेल्या शेकडो लोकांना सेंट्रल रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंता यांनी नोटीस बजावली आहे. रेल्वे प्रशासनाच्या परवानगीशिवाय बांधकाम केलेल्या अतिक्रमित जागेवरील ताबा सात दिवसाच्या आत सोडावा; अन्यथा ते प्रशासकीय यंत्रणेद्वारे काढण्यात येईल, असेही या नोटिसेसच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.
याबाबत रेल्वे विभागाला विचारणा केली असता, त्यांनी ही प्रक्रिया जिल्ह्याभरात राबविली जात असल्याचे सांगितले. वेळप्रसंगी पोलिसांची मदतही घेण्यात येईल. त्याकरिता शहरातील आणि आरपीएफ पोलिसांना कळविण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून बांधकाम काढणार नाहीत, त्यांना कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे या अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.