अकोला शहरातील ३०८ भूखंडांचे सातबारा शासनाच्या नावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:59 AM2018-08-27T10:59:51+5:302018-08-27T11:01:15+5:30
अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले.
- संतोष येलकर
अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. यासंदर्भात तयार करण्यात आलेली अद्ययावत माहिती (रेकॉर्ड) अकोला उप विभागीय अधिकारी कार्यालयामार्फत महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.
अकोला शहरात विविध भागात ‘लेआउट’मधील सार्वजनिक मालकीच्या अनेक खुल्या भूखंडांचे (ओपन स्पेस) ‘रेकॉर्ड’ तसेच सात-बारा उपलब्ध नव्हते. त्यानुषंगाने शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये, तसेच भूखंड ताब्यात घेण्याचे गैरप्रकार टाळण्यासाठी शहरातील सार्वजनिक मालकीच्या भूखंडांची तपासणी करून अद्ययावत ‘रेकॉर्ड’ तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अकोल्याचे उप विभागीय अधिकाऱ्यांना तीन महिन्यांपूर्वी दिला होता. त्यानुसार शहरातील सार्वजनिक मालकीच्या भूखंडांची तपासणी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या पथकांमार्फत करण्यात आली. या तपासणीत घेण्यात आलेल्या माहितीनुसार खुल्या भूखंडांचे अद्ययावत रेकॉर्ड तयार करण्यात आले असून, सार्वजनिक मालकीच्या ३०८ खुल्या भूखंडांचे ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील या भूखंडांची अद्ययावत माहिती आणि ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आल्याचे संबंधित ‘रेकॉर्ड’ अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.
प्रत्येक भूखंडाचा तयार होणार नकाशा!
शहरातील सार्वजनिक मालकीच्या ३०८ खुल्या भूखंडांचे ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आले असून, यामधील प्रत्येक भूखंडाचा नकाशा महसूल विभागामार्फत तयार करण्यात येणार आहे.
फलक लावणार; तारेचे कुंपणही घेणार!
सार्वजनिक मालकीचे भूखंड बळकावण्याचे प्रकार होऊ नये, तसेच अतिक्रमण होऊ नये, यासाठी शहरातील खुल्या भूखंडांवर फलक (बोर्ड) लावणे, तसेच तारेचे कुंपण घेण्याची उपाययोजनादेखील महसूल विभागामार्फत प्रस्तावित आहे.
सार्वजनिक मालकीचे भूखंड बळकावण्याचे गैरप्रकार होऊ नयेत तसेच अतिक्रमण होऊ नये, यासाठी शहरातील खुल्या भूखंडांची तपासणी करण्यात आली असून, ३०८ भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. या भूखंडांच्या अद्ययावत माहितीचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे.
- आस्तिककुमार पाण्डेय
जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी करण्यात आली. ३०८ भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावे करण्यात आले असून, यासंदर्भात तयार करण्यात आलेले अद्ययावत माहितीचे रेकॉर्ड मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.
- संजय खडसे
उपविभागीय अधिकारी, अकोला.