अकोला शहर बनतेय पिस्तूल तस्करीचे केंद्र
By Admin | Published: November 6, 2014 01:08 AM2014-11-06T01:08:48+5:302014-11-06T01:08:48+5:30
गुंड प्रवृत्तीच्या युवकांना देशीकट्टा, पिस्तूलचे आकर्षण.
अकोला : समाजात वावरताना इतरांवर दहशत निर्माण करण्यासाठी, रुबाब वाढविण्यासाठी कमरेवर लावलेली पिस्तूल, देशीकट्टा दाखवत फिरणार्यांच्या संख्येत वाढ होत आहे. गत दोन महिन्यांमध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये ८ पिस्तूल व १६ जिवंत काडतूस जप्त केले. यावरून गुंड युवक व त्यांच्या टोळय़ांमध्ये देशीकट्टा व पिस्तूलचे आकर्षण वाढत असल्याचे सिद्ध होत आहे. गत काही महिन्यांमध्ये शहराध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, कट्टे मिळाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, शहर पिस्तूल तस्करीचे केंद्र बनत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये धारदार शस्त्रांचा वापर केला जात होता; परंतु गत दोन ते तीन वर्षांपासून गुंडाकडून धारदार शस्त्रांसोबतच देशीकट्टा व पिस्तूलचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे शहरात झालेल्या घटनांवरून स्पष्ट झाले.
२00९ मध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादामध्ये देशी पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर २0११ मध्ये आकोट फैलामध्ये दोन गटात झालेल्या सशस्त्र संघर्षामध्ये सुद्धा पिस्तूलचा वापर करण्यात आला होता. शहरामध्ये देशीकट्टा, पिस्तूलची खरेदी व विक्रीसुद्धा होत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले. मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड राज्यांमध्ये जाऊन काही गुंड प्रवृत्तीचे युवक देशीकट्टे व पिस्तूल, जिवंत काडतूस ५ ते १0 हजार रुपयांमध्ये शहरात आणून त्याची विक्री करतात. महिनाभरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी छापे घालून ११ आरोपींकडून ८ पिस्तूल व १६ जिवंत काडतूस जप्त केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून आरोपींनी मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून शहरात विक्री केल्याचेही समोर आले होते.