अकोला : नदीकाठच्या तीन किलोमीटर अंतराची होणार साफसफाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:47 AM2018-01-10T01:47:32+5:302018-01-10T01:48:02+5:30
अकोला : प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या १३ जानेवारी केला जाणार आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीकाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत साफसफाई केली जाणार असून, या मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तथा महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मंगळवारी केले. जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत मोर्णा नदीची साफसफाई व त्याच्या नियोजनाच्या मुद्यावर अकोलेकरांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या १३ जानेवारी केला जाणार आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीकाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत साफसफाई केली जाणार असून, या मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तथा महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मंगळवारी केले. जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत मोर्णा नदीची साफसफाई व त्याच्या नियोजनाच्या मुद्यावर अकोलेकरांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहराच्या मध्यभागातून वाहणार्या मोर्णा नदीची दुर्दशा झाली आहे. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मोर्णा नदीचा वापर केला जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. नदी पात्रात वाढलेली जलकुंभी, डासांची पैदास व दुर्गंधीमुळे नदीकाठच्या रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसहभागातून मोर्णा नदीचे पात्र व नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या १३ जानेवारीपासून मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर मंगळवारी नियोजन भवनमध्ये नदीच्या स्वच्छतेसाठी करण्यात आलेले नियोजन व इतर मुद्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा व महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक, सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य यांसह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, स्थायी समिती सभापती बाळ टाले, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, माजी महापौर सुमनताई गावंडे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्रभात किड्सचे संचालक गजानन नारे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. राजेंद्र सोनोने, शत्रुघ्न बिरकड आदी उपस्थित होते.
१४ पथकांचे केले गठन
१३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या साफसफाईला सिटी कोतवाली चौक ते हिंगणा फाटा परिसरापर्यंत सुरुवात केली जाईल. एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊन कामकाजात व्यत्यय येणार नाही, यासाठी १४ पथकांचे गठन करण्यात आल्याची माहिती मोहिमेचे प्रमुख उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली. प्रत्येक पथकात मनपाचे झोन अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या देखरेखीखाली सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश राहील. नदीकाठी तीन किलोमीटर पर्यंतच्या परिसरात काठावर जाण्यासाठी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. नदीपात्रात उतरून जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी ६0 कामगारांची मदत घेण्यात आली आहे. नागरिकांना नदीपात्रात उतरण्याची गरज नसून, केवळ काठावर जमा झालेली जलकुंभी, गाळ व कचरा उचलून मनपाच्या वाहनांमध्ये टाकावा लागेल, अशी माहिती प्रा. संजय खडसे यांनी दिली. मोहिमेत सहभागी होणार्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी गमबूट, हातमोजे, चेहर्याला मास्क आदी साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे प्रा. खडसे यांनी सांगितले.
सर्पमित्र, नैसर्गिक आपत्ती निवारण पथक ाची मदत
नदीकाठावर मोठय़ा प्रमाणात झाडेझुडपे आहेत. काठावर तसेच नदीपात्रात साप असण्याची शक्यता गृहीत धरून त्या ठिकाणी सर्पमित्रांना तैनात केले जाणार आहे. याव्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती निवारण पथकांचीही मदत घेतली जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय आरोग्य यंत्रणा, पिण्यासाठी पाणी व नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात आल्याची माहिती प्रा. संजय खडसे यांनी दिली.
मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
शहराच्या मध्यभागातून वाहणार्या मोर्णा नदीच्या साफसफाईसाठी जिल्हाधिकार्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले. अकोलेकरांनी या मोहिमेत योगदान देऊन शहर स्वच्छतेसाठी समोर येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी यावेळी केले.