अकोला मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:26 PM2018-08-21T14:26:55+5:302018-08-21T14:30:50+5:30
अकोला : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (एमसीएईआर) उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
अकोला : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (एमसीएईआर) उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती १ आॅगस्ट रोजी करण्यात आली होती. ते भाजपाचे अकोला मतदारसंघाचे खासदार आहेत. एमसीएईआरच्या उपाध्यक्षांना प्रथमच कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२ (ब) च्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पदावर खा. संजय धोत्रे यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी धोरणामध्ये तसेच विस्तार शिक्षण व संशोधनामध्ये सुसूत्रता असावी, याकरिता नियंत्रण व समन्वयासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद राज्यात काम करते.
अभियांत्रिकी आणि विधी शाखेचे पदवीधर असलेले खा. धोत्रे हे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी असून, त्यांना स्व. वसंतराव नाईक उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) सारख्या देशात अग्रगण्य असलेल्या बियाणे निर्मिती व प्रक्रिया महामंडळाचे शेतकरी मतदारसंघातून ते सतत पाच वेळा संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. कृषी आणि कृषी अनुषंगिक क्षेत्रातील त्यांचा अभ्यास व अनुभव लक्षात घेता, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी धोत्रे यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल खा.धोत्रे यांनी आभार व्यक्त करीत, कृषी विद्यापीठांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.