अकोला : शहरातील मोकाट डुकरे पकडणारा कंत्राटदार पळाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:15 AM2018-01-02T01:15:11+5:302018-01-02T01:15:57+5:30
अकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्यांना स्थानिक वराह पालकांनी मारहाण केल्यानंतर कंत्राटदार पळून गेला. आजरोजी शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वराह पालकांची हेकेखोर भूमिका पाहता यावर महापालिका प्रशासन व सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्यांना स्थानिक वराह पालकांनी मारहाण केल्यानंतर कंत्राटदार पळून गेला. आजरोजी शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वराह पालकांची हेकेखोर भूमिका पाहता यावर महापालिका प्रशासन व सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
शहरात मोकाट डुकरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी यासंदर्भात मनपाच्या सभागृहात ठराव पारित केला होता. शहरात वराह पालनाचा व्यवसाय करणारे मनपाच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. संबंधित वराह पालकांनी डुकरांची शहराबाहेर विल्हेवाट लावावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने अनेकदा दिल्या होत्या. त्यानंतर तीन वेळा डुकरे पकडण्याची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. वराह पालकांच्या दबावामुळे कोणीही निविदा सादर केली नाही. अखेर एका स्थानिक कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्य प्रदेश येथील २0 जणांची चमू डुकरे पकडण्यासाठी शहरात आणण्यात आली होती. महापौर विजय अग्रवाल यांच्या प्रभागातून डुकरे पकडण्यास सुरुवात होत नाही, तोच दुपारी संबंधित कंत्राटदाराला खोलेश्वर भागात खदान, कैलास नगर, बापू नगर आदी भागातून आलेल्या ५0 ते ६0 जणांनी महापालिकेच्या मोहिमेला आडकाठी निर्माण करीत कंत्राटदाराला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या दिवसापासून कंत्राटदाराने काम बंद केले ते आजतागायत कायम आहे. परिणामी मोकाट डुकरांच्या समस्येत वाढ झाली असून, अकोलेकरांना घाण व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
महापौरांच्या प्रभागातून कारवाईला प्रारंभ
शहरातील मोकाट डुकरे पकडण्यासाठी स्थानिक वराह पालकांचा तीव्र विरोध असल्याचे पाहून महापौर विजय अग्रवाल यांनी त्यांच्या प्रभाग ५ मधून डुकरे पकडण्याच्या कारवाईला प्रारंभ केला होता. त्याच दिवशी कंत्राटदाराला मारहाण झाली. त्यानंतर ही कारवाई बंद झाली.
तक्रार दिली पण..
मोकाट डुकरे पकडणार्या कंत्राटदाराला मनपाचे सहा.आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन, कोंडवाडा विभाग प्रमुख सुरेश अंभोरे, आरोग्य निरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचार्यांच्या उपस्थितीत मारहाण केली होती, हे येथे उल्लेखनीय. त्यानंतर प्रशासनाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली. मनपाच्या कारवाईला आडकाठी निर्माण करणार्या व्यक्तींवर जरब बसावी, अशी कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही, हे विशेष.