अकोला : व्हीआरडीएल लॅबवर कोरोना चाचणीचा ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:14 AM2020-09-23T11:14:56+5:302020-09-23T11:15:13+5:30

- प्रवीण खेते अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची ...

Akola: Corona test stress on VRDL lab! | अकोला : व्हीआरडीएल लॅबवर कोरोना चाचणीचा ताण!

अकोला : व्हीआरडीएल लॅबवर कोरोना चाचणीचा ताण!

googlenewsNext

- प्रवीण खेते
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, प्रशासनातर्फे चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संकलित नमुन्यांची संख्या वाढली असून, दररोज क्षमतेच्या अडीच पट चाचण्या केल्या जात आहे. परिणामी व्हीआरडीएल लॅबवरील ताण वाढला असून, रुग्णांना अहवालासाठी पाच ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने चाचण्यांवर भर दिला जात आहे. गत १५ दिवसात संकलित नमुन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्हीआरडीएल लॅबवर ताण वाढला आहे. व्हीआरडीएल लॅबची क्षमता दिवसाला २५० नमुने तपासणीची आहे; मात्र संकलित नमुन्यांची संख्या वाढल्याने दररोज क्षमतेच्या अडीच पट म्हणजेच सुमारे ८०० चाचण्या केल्या जात आहे. रात्रंदिवस नमुने चाचण्यांचे कार्य सुरू असूनही रुग्णांना चाचणीसाठी पाच ते सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातीलही नमुने तपासणीसाठी अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबमध्ये येत आहेत. परिणामी लॅबवरील ताण वाढला आहे.


दररोज तपासणीसाठी येताहेत १,८०० ते २,००० नमुने
शासकीय वैद्यकीय महाविद्यालायातील व्हीआरडीएल लॅबमध्ये दररोज १,८०० ते २,००० नमुने तपासणीसाठी येतात; मात्र लॅबची क्षमता दिवसाला केवळ २५० नमुने तपासणीची आहे; मात्र तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने चाचण्यांही क्षमतेपेक्षा जास्त केल्या जात आहेत. दररोज जवळपास ८०० चाचण्या केल्या जात आहे.


केवळ दहा कर्मचाऱ्यांवर भार
जीएमसीतील व्हीआरडीएल लॅबचा कारभार केवळ दहा कर्मचारी हाकत आहेत. मागील सहा महिन्यांपासून हे कर्मचारी रात्रंदिवस कामकाज करत असून, एकही दिवस सुटी घेतली नसल्याची माहिती आहे. चाचण्यांचा ताण वाढला असताना मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे; मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कर्मचाºयांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.


तर बेफिकिरीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता
कोविड चाचणीचा अहवाल मिळण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. तर दुसरीकडे नवीन नियमावलीनुसार, रुग्णांना दहा दिवसांऐवजी केवळ सात दिवस क्वारंटीन केले जात आहे. त्यानंतर त्याला १४ दिवसांचे होम क्वारंटीन केले जात आहे. अशा परिस्थितीत स्वॅब दिल्यानंतर सात दिवसांनी अहवाल मिळत असेल, तर रुग्णांकडून बेफिकिरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोरोना चाचणीसाठी संकलित नमुन्यांची संख्या वाढली असून, व्हीआरडीएल लॅबवर त्याचा ताण वाढला आहे. किमान मनुष्यबळ असतानाही दररोज क्षमतेपेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

 

Web Title: Akola: Corona test stress on VRDL lab!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.