अकोला मनपा हद्दवाढीत २४ गावांचा समावेश
By admin | Published: April 8, 2016 02:07 AM2016-04-08T02:07:34+5:302016-04-08T02:07:34+5:30
गोपीकिशन बाजोरियांच्या लक्षवेधीवर रणजित पाटील यांचे उत्तर.
अकोला: महानगरपालिकेच्या हद्दीत वाढ करून, २४ गावांचा समावेश होणार आहे, असे नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत स्पष्ट केले. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.
महानगरपालिका हद्दवाढीच्या मुद्यावर आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले, की अकोला महानगरपालिका परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत आहे. त्यानुषंगाने या भागासाठी सोयी-सुविधा पुरविणे, नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीत वाढ करून, परिसरातील २४ गावांचा समावेश होणार आहे. यासंदर्भात १७ मार्च २0१६ रोजीच्या राजपत्रात प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रसिद्धीच्या दिनांकापासून ३0 दिवसांच्या आत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त होणार्या हरकती आणि सूचनांसंदर्भात विभागीय आयुक्तांनी बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात येणार असून, त्यानंतर मनपा याबाबत निर्णय घेणार आहे, असेही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. या मुद्यावर सभागृहात झालेल्या चर्चेत आ. जयंत पाटील, आ. सुनील तटकरे व आ. माणिकराव ठाकरे यांनी सहभाग घेतला.