अकोला महापालिकेचे ९४ कर्मचारी लेट लतिफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:26 AM2017-12-09T01:26:44+5:302017-12-09T01:28:18+5:30
अकोला महापालिकेचे आयुक्त पद तसेच दोन्ही उपायुक्त पद रिक्त असल्याचे पाहून मनपा अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे चित्र शुक्रवारी समोर आले. प्रभारी उपायुक्त प्रा. संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता विविध विभागांची झाडाझडती घेतली असता, चक्क ९४ कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेचे आयुक्त पद तसेच दोन्ही उपायुक्त पद रिक्त असल्याचे पाहून मनपा अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे चित्र शुक्रवारी समोर आले. प्रभारी उपायुक्त प्रा. संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता विविध विभागांची झाडाझडती घेतली असता, चक्क ९४ कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधित ‘लेट लतिफ’ कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची राज्य शासनाने १0 नोव्हेंबर रोजी बदली केली. आयुक्तपदी जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेशही जारी झाला. नगर विकास विभागाच्या अखत्यारित येणार्या ‘एमएमआरडीए’ने वाघ यांना अद्या पही कार्यमुक्त न केल्यामुळे ते रुजू होऊ शकले नाहीत. तेव्हापासून मनपाचे आयुक्त पद रिक्त आहे. यात भरीस भर मुख्य लेखा परीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे दीर्घ रजेवर आहेत. तर तत्कालीन उपायुक्त समाधान सोळंके यांना कार्यमुक्त केल्यामुळे त्यांचे पदही रिक्त आहे. अर्थातच, मनपाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून सुरू आहे. आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकार्यांकडे तसेच दोन्ही उ पायुक्त पदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे सोपविण्या त आला आहे. या सर्व परिस्थितीचा गैरफायदा स्थानिक अधिकारी व कर्मचारी घेत असल्याचे दिसून येते. मनपात सक्षम अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने इतर कर्मचारी निरंकुश झाले आहेत. कार्यालयात हजर न राहता परस्पर घरी निघून जात असल्याने प्रशासकीय कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले आहे. हा प्रकार ध्यानात आल्यामुळे शुक्रवारी प्रभारी उपायुक्त संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता विविध कार्यालयांची आकस्मिक पाहणी केली असता तब्बल ९४ कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सर्व विभागांमध्ये शुकशुकाट!
प्रभारी उपायुक्त संजय खडसे यांनी सकाळी मालमत्ता कर विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जलप्रदाय विभाग, नगररचना विभाग, बाजार, परवाना विभाग, आरोग्य विभाग, लेखा विभाग, विद्युत विभाग, अंतर्गत लेखा परीक्षक विभाग, विधी विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभागाची पाहणी केली असता, कर्मचार्यांअभावी शुकशुकाट आढळून आला.