अकोल्यातील क्रिकेट सट्ट्याचे कनेक्शन मंगरूळपीरपर्यंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2017 03:57 AM2017-06-09T03:57:01+5:302017-06-09T03:57:01+5:30
एकजण ताब्यात; आणखी काही सट्टेबाज अडकण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: चॅम्पियन ट्रॉफीमधील इंग्लंड विरुद्ध न्युझिलंड क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार जणांना खदान पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. पोलिसांनी आणखी एकजण ताब्यात घेतला असून, त्याची चौकशी सुरू आहे. क्रिकेट सामन्यावरील सट्ट्याचे कनेक्शन मंगरूळपीरपर्यंत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले असून, आणखी काही सट्टेबाज यात अडकण्याची शक्यता आहे.
दक्षतानगर संकुलमधील कृष्णा पान अॅण्ड कोल्ड्रिंक्स या प्रतिष्ठानामध्ये इंग्लड आणि न्यूझीलंड संघादरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांना मिळाली. त्यांनी सामना सुरू झाल्यानंतर ते अखेरपर्यंत या माहितीची पडताळणी करीत सट्टा सुरू असलेल्या प्रतिष्ठानावर छापा टाकला. त्यानंतर या ठिकाणावरून सिंधी कॅम्पमधील रहिवासी संतोष आत्माराम मनवानी, महेश दयाराम अमरनानी, विक्की श्यामसुंदर गोस्वामी आणि अविनाश राजेश मेंगे या चार सट्टा माफियांचा अटक करून त्यांच्याकडून १२ हजार रोख, तीन मोबाइल, टीव्ही, सेटअप बॉक्ससह ३० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील मोहित शर्मा नामक व्यक्तीस खदान पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. क्रिकेट सट्टा प्रकरणारे कनेक्शन मंगरूळपीरपर्यंत असून, आणखी काही सट्टेबाजांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.