अकोला : लुटमार व मारहाणीचे गुन्हे भोवले; जुने शहरातील सहा जणांवर मकोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:39 AM2018-01-25T01:39:57+5:302018-01-25T01:40:03+5:30
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांड व प्राणघातक हल्ला प्रकरणातील सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये किशोर सुधाकर वानखडे, अश्विन उद्धवराव नवले, सागर कृष्णसा पुर्णये, आशिष शिवकुमार वानखडे, राहुल खडसान, मंगेश टापरे या सहा जणांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांड व प्राणघातक हल्ला प्रकरणातील सहा आरोपींवर (मकोका) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये किशोर सुधाकर वानखडे, अश्विन उद्धवराव नवले, सागर कृष्णसा पुर्णये, आशिष शिवकुमार वानखडे, राहुल खडसान, मंगेश टापरे या सहा जणांचा समावेश आहे.
शिवसेना वसाहतमधील रहिवासी तुषार नागलकर यांच्या घरी १४ डिसेंबरच्या मध्यरात्री दारूच्या नशेत धुंद असलेले शैलेश अढाऊ, अश्विन नवले, सागर पुर्णये, राहुल खडसान, मंगेश टापरे, आशिष वानखडे व किशोर वानखडे यांच्यासह आणखी काही युवकांनी हैदोस घालून नागलकरला ईल शिवीगाळ करीत मारहाण केली होती. या प्रकरणात सदर सहा जणांनी नागलकर याला मारहाण केल्यानंतर तुषार नागलकर व त्याच्या भावडांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात शैलेश अढाऊ याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केल्याने तो जागीच ठार झाला होता, तर तुषार नागलकरही गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तुषार नागलकर याच्या घरावरील हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या किशोर वानखडे, अश्विन नवले, सागर पुर्णये, राहुल खडसान, मंगेश टापरे, आशिष वानखडे यांच्या गुन्हेगारी पृष्ठभूमीच्या तक्रारी थेट पोलीस अधीक्षक तसेच लोकप्रतिनिधींकडे झाल्यानंतर त्यांनी सदर सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे यांच्याकडे पाठविला.
सदर सहा जणांवर दाखल असलेल्या गुन्हय़ांच्या पृष्ठभूमीवरून त्यांच्याविरुद्ध मकोका कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक वाकडे यांनी मंजुरी दिली. त्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३0७ मध्ये मकोकाच्या कलम दाखल करून हा तपास आता स्वतंत्रपणे सुरू करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्धचा खटला आता अमरावती येथील मकोकाच्या विशेष न्यायालयात चालणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पडघन यांनी पहिल्यांदा उगारले होते मकोकाचे अस्त्र
अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत २0१0 मध्ये टोळीयुद्ध भडकल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अकोट फैलचे तत्कालीन ठाणेदार गजानन पडघन यांनी जिल्हय़ात पहिल्यांदा मकोका कारवाईचे अस्त्र उगारले होते. ठाणेदार गजानन पडघन यांनी अकोट फैलातील टोळय़ांवर मकोका कारवाई केल्यानंतर जिल्हय़ातील टोळीयुद्ध संपुष्टात आले; मात्र त्यानंतर आता जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले विक्की खपाटे, किशोर खत्री, प्रशांत निंघोट, शैलेश अढाव हत्याकांडांनतर पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर कारवाईचा पवित्रा स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
लोकप्रतिनिधींकडे नागरिकांची धाव
सदर सहा आरोपींमुळे गुन्हेगारी वाढल्याच्या तक्रारी वसाहतमधील नागरिकांनी लोकप्रतिनिधी तसेच पोलीस अधीक्षकांकडे केल्या होत्या. यावरून दोन आमदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या सहा जणांवर मकोकाची कारवाई करण्यासंदर्भात विनंती केली. त्यानंतर सदर सहा आरोपींची गुन्हेगारी पृष्ठभूमी तपासल्यानंतर त्यांच्यावर मकोकानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
जिल्हय़ात गत काही दिवसांपासून सुरू असलेले खून तसेच लुटमारीच्या घटनांना आळा घालून गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी अट्टल संघटित गुन्हेगारांवर मक ोकाची कारवाई करणे गरजेचे होते. त्यामुळेच सदर आरोपींवर मकोका कारवाईचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठविला होता. जुने शहरातील नागरिकांच्या तक्रारी तसेच या सहा जणांच्या वाढलेल्या गुन्हेगारीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
- एम. राकेश कलासागर,
पोलीस अधीक्षक, अकोला.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या सहा जणांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही गुन्हे दाखल नसले, तरीही या आरोपींचा त्यांना त्रास असल्याच्या तक्रारी त्यांना अटक केल्यानंतर प्राप्त झाल्या. त्यामुळे या सहा जणांवर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने मकोका कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याकडे सादर केला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
- गजानन पडघन,
ठाणेदार, जुने शहर पोलीस स्टेशन, अकोला.