Akola: चार लाखांची बॅग लंपास करणाऱ्या गुन्हेगारास ठाेकल्या बेड्या
By आशीष गावंडे | Published: October 1, 2024 09:38 PM2024-10-01T21:38:09+5:302024-10-01T21:38:22+5:30
Akola News: राष्ट्रीय महामार्गालगतच्या लाेणी राेडवरील नवीन किराणा मार्केट मधून एका चारचाकी वाहनाला अडकवलेली चार लाखांची बॅग दाेन अज्ञात चाेरट्यांनी सिने स्टाइल लंपास केल्याची घटना १२ फेब्रुवारी २०२४ राेजी घडली हाेती.
- आशिष गावंडे
अकोला - राष्ट्रीय महामार्गालगतच्या लाेणी राेडवरील नवीन किराणा मार्केट मधून एका चारचाकी वाहनाला अडकवलेली चार लाखांची बॅग दाेन अज्ञात चाेरट्यांनी सिने स्टाइल लंपास केल्याची घटना १२ फेब्रुवारी २०२४ राेजी घडली हाेती. याप्रकरणी जुने शहर पाेलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्याकडे साेपविल्यानंतर आठ महिन्यानंतर ‘एलसीबी’च्या चमुने सराइत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड येथून शिताफीने अटक केली.
आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपुत (३२ रा. विद्या नगर, झोपडपट्टी आयशा मस्जीद मागे चिंचवड, पुणे)असे अटक करण्यात आलेल्या सराइत व कुख्यात आराेपीचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या नवीन किराणा मार्केटमध्ये १२ फेब्रुवारी राेजी फिर्यादी शुभम संजय बेहरे किराणा साहित्य खरेदीसाठी आले हाेते. त्यांच्याकडील चार लाख रूपयांची बॅग टाटा एस गाडीला मागील बाजूने अडकवलेली होती. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बॅग घेऊन पळ काढला. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरूध्द भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता.
बॅग लंपास करण्यात पटाइत
शहरात जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत रामदास पेठ, सिव्हील लाईन, सिटी कोतवाली व जुने शहर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत चार ठिकाणी बॅग लंपास व चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. गुन्हेगारांची कार्यशैली लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांना तपास करण्याचे निर्देश दिले. तपासाअंती आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपुत हा सराइत गुन्हेगार असून ताे बॅग लंपास करण्यात पटाइत असल्याचे निष्पन्न झाले.
सुगावा लागला पण...
तपास पथकातील ‘पीएसआय’गोपाल जाधव, माजीद पठाण, अंमलदार अब्दुल माजीद, वसीमोद्दीन शेख, रविंद्र खंडारे, अविनाश पाचपोर, भास्कर धोत्रे यांना काही महिन्यांपूर्वीच आराेपीचा सुगावा लागला हाेता. परंतु आराेपी राजपूत हा पुणे जिल्ह्यातूनही तडीपार असल्याने त्याचा नेमका ठावठिकाणी सापडत नव्हता. अखेर आठ महिन्यानंतर त्याला राहत्या घरुन शिताफीने अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचे इतर दाेन साथीदार फरार असून त्यांचा शाेध घेतला जात आहे.