लॉकडाऊननंतर पोलीस बंदोबस्त कमी होताच बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:49 PM2020-08-11T12:49:13+5:302020-08-11T12:49:37+5:30
बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड वर्दळ सुरू होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आले.
अकोला : कोरोनाचे सावट शहरासह जिल्ह्यात अधिक गडद होत असल्याने रविवारच्या लॉकडाऊननंतर पोलीस बंदोबस्त कमी होताच बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड वर्दळ सुरू होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या पाहणीत उघडकीस आले.
कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात ३ हजारावर झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची दमछाक होत असल्याने नागरिकांनी संयम पाळून घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे; मात्र अशातच शहरातील बाजारपेठेत गर्दी होत असल्यामुळेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात रात्री उशिरापर्यंत गर्दी करण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. लॉकडाऊननंतर पोलिसांची बंदोबस्तावरील संख्या कमी होतच नागरिक रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले. या गर्दीमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही मत व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील पोलिसांची संख्या तोकडी
शहरातील ८ पोलीस ठाण्यांमध्ये १ हजाराच्या आसपास पोलिसांची संख्या आहे. यामधील ४४० पोलिसांचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांची कंटेनमेन्ट झोनमध्ये ड्युटी नाही. तर उर्वरित असलेल्या ५६० पोलिसांमधील १६० पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाणे, न्यायालय, तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कंटेनमेन्ट झोनसाठी ४०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत ४०० होमगार्डही तैनात करण्यात आले असून, त्यांची ड्युटी रात्री १० वाजेपर्यंत लावण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांची संख्या कमी होत असल्याची माहिती आहे.