अकोला : अली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्याच्या मृत्यू; घातपाताचा संशय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 02:10 AM2018-02-26T02:10:29+5:302018-02-26T02:10:29+5:30
अकोला : पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमध्ये केजीमध्ये शिक्षण घेत असलेला पाच वर्षाचा चिमुकला स्कूलमधून घरी परतल्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूमागे संशयाची सुई शाळेतील शिक्षकांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पातूर रोडवर असलेल्या अली पब्लिक स्कूलमध्ये केजीमध्ये शिक्षण घेत असलेला पाच वर्षाचा चिमुकला स्कूलमधून घरी परतल्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूमागे संशयाची सुई शाळेतील शिक्षकांवर आली आहे. चिमुकल्याच्या डोक्यामध्ये रक्त गोठल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जुने शहर पोलिसांनी आता घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला आहे. मिर्झा अहमद रझा बेग हा चिमुकला नेहमीप्रमाणे शनिवार सकाळी ८ वाजता शाळेत गेला होता. दुपारी १२ वाजता घरी आल्यानंतर त्याला उलट्या झाल्या. आई-वडिलांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला सर्वोपचारमध्ये हलवण्यात आले होते. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्याच्या डोळ्याखाली लाल झाल्याचे व जखमा दिसून आल्या होत्या. चिमुकल्याच्या मृत्यूचा धक्का बसलेले आई-वडील तत्काळ जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली व मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर सर्वच प्रकार संशयास्पद वाटत असल्याने ठाणेदार गजानन पडघन यांनी मुलाचे शवविच्छेदन केल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे ठरवले होते. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या डोक्यात रक्त गोठल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा तपासाचा रोख आता शाळेवर गेला आहे.