अकोला जिल्ह्यात १६ हजारांवर मतदारांची वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:18 PM2019-09-07T12:18:31+5:302019-09-07T12:18:43+5:30
प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात १६ हजार ३६७ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या १५ लाख ७४ हजार ९१ आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी १५ जुलैपर्यंत मतदारांची संख्या १५ लाख ५७ हजार ७२४ होती. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्यात १६ हजार ३६७ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार यादीनुसार गत १५ जुलैपर्यंत मतदारांची संख्या १५ लाख ५७ हजार ७२४ इतकी होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत गत ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या १५ लाख ७४ हजार ९१ इतकी आहे. त्यामध्ये ८ लाख १२ हजार १८१ पुरुष, ७ लाख ६१ हजार ८६४ महिला व ४६ इतर मतदारांचा समावेश आहे. म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात १६ हजार ३६७ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.
२६०८ मतदारांची नावे वगळली!
जिल्ह्यातील अंतिम मतदार यादीतून २ हजार ६०८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये मयत व स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे.
१८,९७४ नवीन मतदारांची नावे समाविष्ट!
गत १५ जुलैनंतर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीत १८ हजार ९७४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. अंतिम मतदार यादीत या नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली.
विधानसभा मतदारसंघनिहाय आता अशी आहे मतदारांची संख्या!
मतदारसंघ मतदार
अकोट २८४८४३
बाळापूर २९४४४६
अकोला पश्चिम ३३११६१
अकोला पूर्व ३४३४४१
मूर्तिजापूर ३२०१६०
..............................................................
एकूण १५७४०९१