खरेदीविना तूर, हरभरा घरात; ५२ हजार शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:40 PM2018-06-02T15:40:24+5:302018-06-02T15:40:24+5:30
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद करण्यात आली असून, आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर, हरभरा खरेदीविना अद्याप पडून असल्याने, शेतकरी पेचात सापडला आहे.
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद करण्यात आली असून, आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर, हरभरा खरेदीविना अद्याप पडून असल्याने, शेतकरी पेचात सापडला आहे. खरीप पेरणी तोंडावर आली असताना, तूर व हरभरा खरेदीचा प्रश्न कायम असल्याने, पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, पातूर, पारस, वाडेगाव व पिंजर या सात केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी करण्यात आली. तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील ४५ हजार ९५५ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली तर हरभरा खरेदीसाठी २३ हजार शेतकºयांनी नोंदणी केली. खरेदीची मुदत संपल्याने, गत १५ मे पासून नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आली तसेच २९ मे पासून हरभरा खरेदी बंद करण्यात आली. खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जिल्ह्यातील गोदामात जागा उपलब्ध नसल्याने, खरेदीच्या सुरुवातीपासूनच तूर व हरभरा खरेदी संथगतीने करण्यात आली. त्यामुळे खरेदी बंद होईपर्यंत आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी केवळ १३ हजार ८०९ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली असून, ३ हजार शेतकºयांचा हरभरा खरेदी करण्यात आला. नोंदणी केलेल्या ३२ हजार १४६ शेतकºयांची तूर आणि २० हजार शेतकºयांचा हरभरा खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार १४६ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदीविना अद्याप घरात पडून आहे. खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना तूर व हरभºयाची खरेदी अद्याप बाकी असल्याच्या स्थितीत खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व जमीन मशागतीचा खर्च कसा भागविणार, असा पेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
चुकारेही प्रलंबित !
नाफेड मार्फत तूर व हरभरा खरेदीत गत २ मार्चपासून जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या तूर व हरभºयाचे चुकारेही अद्याप करण्यात आले नाही. तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले तूर, हरभरा खरेदीचे चुकारे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.