अकोला जिल्ह्यात ७२४ बालरक्षक असूनही आढळतात शाळाबाह्य मुले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:27 PM2018-12-15T14:27:58+5:302018-12-15T14:28:22+5:30

जिल्ह्यात ७२४ शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यानंतरही जिल्ह्यासोबतच शहरात अनेक ठिकाणी शाळाबाह्य मुले आढळून येत आहेत.

 Akola district 724 out of school children | अकोला जिल्ह्यात ७२४ बालरक्षक असूनही आढळतात शाळाबाह्य मुले!

अकोला जिल्ह्यात ७२४ बालरक्षक असूनही आढळतात शाळाबाह्य मुले!

Next

- नितीन गव्हाळे
अकोला: समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करून शाळाबाह्य मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची मोहीम राबविण्यात येणार होती. त्यासाठी जिल्ह्यात ७२४ शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यानंतरही जिल्ह्यासोबतच शहरात अनेक ठिकाणी शाळाबाह्य मुले आढळून येत आहेत. त्यामुळे शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम कुठे थांबली आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य विद्यार्थी आहेत, तसेच शाळेत एक महिन्यापेक्षा अधिक गैरहजर राहणारे विद्यार्थी, शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या शोधासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येणार होती. त्यासाठी तालुकानिहाय नेमलेल्या बालरक्षकांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक शाळा स्तरावर शाळाबाह्य मुले शोधून त्यांना पूर्णत: शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षण हमी कार्ड देण्यात येणार होते. या शोधमोहिमेच्या माध्यमातून सरल प्रणाली ड्रॉफ बॉक्स निरंक करण्याचे उद्दिष्टसुद्धा ठेवण्यात आले होते; परंतु ही मोहीम केवळ कागदावरच राहिली असून, गत महिनाभरामध्ये किती शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला, किती विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड दिले, याची माहिती अद्यापही अनुत्तरितच आहे. ७२४ शिक्षकांची बालरक्षक म्हणून निवड केल्यानंतर किती बालरक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला. अकोट येथील एका शाळाबाह्य विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर आणखी दोन विद्यार्थी जून २0१८ पासून शाळेत गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांचा शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून शोध का घेण्यात आला नाही, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्ह्यात ७२४ बालरक्षक कार्यरत असताना एकाही शाळाबाह्य विद्यार्थ्याला शिक्षण प्रवाहात आणण्यात आले नाही, हे या घटनेवरून स्पष्ट होते.

शासनाचा आदेश गेला उडत!
शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा व व्यवस्थापन समिती यांनी एक ते पाच किमी परिसरातील शाळाबाह्य मुलांचा नियमितपणे आढावा घेऊन पालकांना भेटून, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी प्रवृत्त करावे, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी दर दोन महिन्यांमध्ये तपासणी करावी, शाळेत दाखल न झालेली मुले वरिष्ठांना आढळली, तर संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा आदेश काढला होता; परंतु जिल्ह्यात एकाही अधिकाऱ्याकडून शाळाबाह्य मुलांबाबत चौकशी होत नाही, तपासणी होत नाही.



कुठे थांबली शोधमोहीम: शेकडो विद्यार्थी एक महिन्यापेक्षा गैरहजर

शाळाबाह्य व एक महिन्यापेक्षा गैरहजर मुले
अकोला- ८४
अकोट- १0९
बाळापूर- २२
बार्शीटाकळी- २४
मूर्तिजापूर- २६
पातूर- ३३
तेल्हारा- २१

 

Web Title:  Akola district 724 out of school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.