कोरोनाची साखळी तोडण्यात अकोला जिल्हा प्रशासनाला अपयश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:52 AM2020-05-21T09:52:47+5:302020-05-21T09:55:21+5:30
कोरोनाचा विळखा संपूर्ण शहराला बसला असतानाही यंत्रणांमधील असमन्वयाची भूमिका दूर होताना दिसत नाही.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : एका मजुराचा मृतदेह चक्क हातगाडीवर नेण्यात आला. कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मूर्तिजापूरच्या नागरिकांना मृतदेह सुपूर्द करण्यात आला. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही सर्वोपचारमध्ये दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसह त्यांचे कर्मचारी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठीही मदतीची हाक मारावी लागली. मुंबईवरून थेट अकोल्यात दुचाकीवरून धडकणारा कोरोना पॉझिटिव्ह निघाला.
असे अनेक प्रसंग व घटना गेल्या वीस दिवसात घडल्या आहेत. ही प्रत्येक घटना वेगवेगळी असली तरी कोरोना प्रतिबंधासाठी योद्धा म्हणून लढत असलेल्या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे एक समान सूत्र या घटनांमध्ये दडलेले आहे. जिल्हा प्रशासनाने लावलेल्या संचारबंदीत राजरोसपणे फिरता येते, पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहनधारक बिनभोबाट फिरतात तर सर्वाेपचारमधील अव्यवस्थेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. वरील सर्वच प्रसंगात या प्रत्येक यंत्रणांच्या अपयशाची बिजे रोवली आहेत. एकीकडे गेल्या वीस दिवसात अकोल्यातील कोरोना बाधितांची संख्या ही राज्यातील इतर महानगरांच्या तुलनेत झपाट्याने वाढत असतानाच प्रशासकीय स्तरावरील गोंधळही आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात रुग्णालय यंत्रणा असो की प्रशासकीय यंत्रणा यांच्यामधील लहान-मोठ्या त्रुटींवर राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह माध्यमांनीही थोडे दुर्लक्ष केले. त्याचे कारण म्हणजे अशा आणीबाणीच्या काळात या यंत्रणांचे नैतिक बळ कमी होऊ नये, हेच होते; मात्र आता कोरोनाचा विळखा संपूर्ण शहराला बसला असतानाही यंत्रणांमधील असमन्वयाची भूमिका दूर होताना दिसत नाही, त्यामुळेच कोरोनाची साखळी तोडण्यात अकोल्याला अपयश येत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाचे हॉटस्पाट झालेल्या भागातच महापालिकेने तपासणीचे केंद्र उभारून प्रत्येक रुग्णाचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. खरेतर ही व्यवस्था कोरोना बाधितांचे ट्रेसिंग करण्याच्या दृष्टीने उत्तम ठरली असल्यानेच कोरोनाचे रुग्ण झपाट्याने समोर येत आहेत; मात्र या चाचणीमधून जे बाधित निघाले त्यांना उपचारासाठी सर्वोपचारमध्ये पाठविल्यावर तेथे रुग्णांची देखभाल व्यवस्थित होत नाही, ही ओरड होतीच; त्यात आता १८ मेच्या रात्री बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत चक्क घरी पाठविण्यात आल्याचेही उघड झाले, त्यामुळे रुग्णांना सर्वोपचारचा आधार वाटणार कसा? जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केले; मात्र त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, बँका यांच्या वेळा तीन वेळ बदलल्या. सम-विषमचे धोरण लागू होण्यापूर्वीच मागे घेतल्या गेले. पहिले दोन, तीन दिवस वगळले तर नंतर कुठे पोलिसांचा दंडुकाही दिसला नाही. अवैध दारू विक्री सुरूच असल्याचे पोलिसांनीच केलेल्या कारवायांनी स्पष्ट केले तर मुंबईतून थेट दुचाकीवर अकोला गाठण्यात आले; मात्र कोणत्याही चेकपोस्टवर त्यांना अडविल्या गेले नाही, हे तो इसम कोरोनाबाधित झाल्यावर समोर आले. त्यामुळे यंत्रणांमध्ये समन्वय आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तज्ज्ञ होण्याची गरज नाही.