अकोला : जिल्हा प्रशासनामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:50 PM2017-12-11T22:50:56+5:302017-12-11T22:53:56+5:30
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले. राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत ७ डिसेंबर रोजी देण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले. कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे दहा दिवसांत पूर्ण करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. प्रशासनामार्फत गठित पथकांकडून करण्यात येत असलेल्या पंचनाम्यांमध्ये जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
‘या’ पथकांकडून करण्यात येत आहेत पंचनामे!
कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तालुका स्तरावर पथके गठित करण्यात आली आहेत. त्यानुसार संबंधित तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या पथकांकडून जिल्ह्यात सातही तालुक्यांतील गावागावांत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहेत.
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात झालेल्या कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांकडून सुरू करण्यात आले आहे. पंचनाम्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी