अकोला जिल्ह्यातील दुष्काळ विधानसभेत गाजला!
By admin | Published: March 11, 2016 03:10 AM2016-03-11T03:10:03+5:302016-03-11T03:10:03+5:30
अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करा; रणधीर सावरकर यांची मागणी.
अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या अकोला जिल्ह्यातील ९९७ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असताना केवळ ५५ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील हजारो दुष्काळग्रस्त शेतकर्यांना अर्थसाहाय्य देताना झालेला भेदभाव शेतकर्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत केली.
जिल्ह्यातील २0१५-२0१६ मध्ये पैसेवारी ४२ पैसे असतानासुद्धा जिल्ह्यातील ९९७ गावांपैकी ५५ गावांना अर्थसाहाय्य देण्यात आले. ९४२ गावांना या शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहेत. या संदर्भात विभागीय व जिल्ह्यातून महसूल विभागातर्फे माहिती देताना कोणती अनियमितता झाली, याची चौकशी करून हवालदिल शेतकर्याला मदतीचा हात शासनाने द्यावा, अशी मागणी आ. सावरकर यांनी उचलून धरली. तीन वर्षांपासून शेतकरी नापिकी आणि दुष्काळामुळे त्रस्त आहे. या देशातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यामुळे दुष्काळाने आलेल्या मंदीचा फटका शहरी भागातसुद्धा पडत आहे. यामुळे शेतकर्यांसोबत सर्वसामान्य नागरिकसुद्धा हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांच्या भावना समजून अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांतील शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली. या बाबत कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचल्या असून, शेतकर्यांना शासन वार्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहील, असे आश्वासन दिले.