अकोला जिल्हय़ात ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ कारवाईचा फज्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:35 AM2018-01-02T01:35:52+5:302018-01-02T01:38:47+5:30
अकोला : नववर्षाच्या स्वागतासाठी वाईन बार आणि हॉटेल्सला रात्रभर सूट दिल्यानंतर झिंगाट तरुण-तरुणींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले. मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ १४ ड्रक अँण्ड ड्राइव्ह’च्या कारवाया करण्यात आल्याचे वास्तव आहे.
सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नववर्षाच्या स्वागतासाठी वाईन बार आणि हॉटेल्सला रात्रभर सूट दिल्यानंतर झिंगाट तरुण-तरुणींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले. मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ १४ 'ड्रक अँण्ड ड्राइव्ह’च्या कारवाया करण्यात आल्याचे वास्तव आहे. नशेत तर्र्र असलेल्या युवकांचा रात्रभर हैदोस सुरू असताना आणि त्यासाठी चौकाचौकांत मोठा बंदोबस्त तैनात असतानाही केवळ १४ कारवाया झाल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला जिल्हय़ातील पोलीस अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हय़ातील वाईन बार व हॉटेल्स रात्रभर सुरू होते. शहरासह जिल्हय़ातील बहुतांश हॉटेल्स व वाईन बारवर मद्यधुंद युवकांचा दारूच्या नशेत धिंगाणा सुरू होता. यामध्ये विद्या नगरसह शहरातील अनेक हॉटेल्सचा समावेश आहे. या मद्यधुंदांर वचक राहावा म्हणून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी जिल्हय़ातील पोलीस अधिकार्यांना तळीरामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ करणार्यांवर कारवाईचा विशेष मॅसेज वायरलेसवर देण्यात आला. रात्रभर दोन हजारांवर पोलिसांचा ताफा तैनात केला मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील पोलीस अधिकार्यांनी केवळ १४ ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ करणार्यांवर कारवाई केली. यावरुन अकोला पोलीस रात्रभर किती सजग होते, याचा अंदाज येत असून, पोलिसांची ही कारवाईची आकडेवारी मान खाली घालणारी असल्याचे वास्तव आहे. खुद्द पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ करणार्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतरही कारवाई करण्यात टाळाटाळ केली असल्याचे वृत्त आहे.
अकोट ग्रामीणमध्ये सर्वाधिक कारवाया
अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात सर्वाधिक चार तळीरामांवर कारवाई करण्यात आली. तसेच अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा शहरात मात्र कारवाईला बगल देण्यात आली आहे. एवढय़ा मोठय़ा अकोला शहरात ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ करणार्या केवळ ४ ते ५ जणांवर कारवाई करण्यात आली. यावरून अकोला जिल्हय़ात नववर्षाचा जल्लोषच झाला नसल्याचे दिसून येत आहे.
मद्यपींचा रात्रभर धिंगाणा
जिल्हय़ात केवळ १२ कारवाया झाल्यामुळे अकोल्यात दारू विक्रीच झाली नसल्याचा शोध काही पोलिसांकडून लावण्यात येत आहे. म्हणजेच नववर्षाच्या स्वागताला नागरिकांनी टाळल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, जिल्हय़ातील हॉटेल व लॉन्सवर रविवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत चाललेला धिंगाणा पोलिसांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालणारा आहे.