अकोला जिल्हय़ात एक लाख लीटरच्यावर दुधाचा तुटवडा!
By admin | Published: December 16, 2014 01:06 AM2014-12-16T01:06:37+5:302014-12-16T01:06:37+5:30
पश्चिम महाराष्ट्र, खान्देशहून येणा-या दुधावर भिस्त.
अकोला : जिल्हय़ातील दुग्धोत्पादन घटले असून, जवळपास एक लाख लीटरच्यावर दुधाचा तुटवडा निर्माण झाल्याने पश्चिम महाराष्ट्र, खान्देशातून येणार्या दुधावर जिल्हय़ाची गरज भागविली जात आहे. खुल्या पद्धतीने दुधाची विक्री होत असल्याने नागरिकांना शुद्ध दूध मिळणे कठीणच झाले आहे.
जिल्हय़ातील दूध संकलन करणार्या २४६ पैकी बहुतांश संस्था बंद पडल्या असून, शासकीय दूध योजनेचे दूध संकलन घटले नव्हेतर बंदच आहे. ज्या काही सहकारी दूध संस्था आहेत. त्यातील वर्तमानस्थितीत जिल्हय़ातील केवळ सात संस्थांचे दूध संकलन सुरू आहे. यामध्ये मूर्तिजापूर येथील दूध संकलन केंद्राकडून २ हजार ४५0 लीटर दुधाचा पुरवठा शासकीय दूध योजनेला केला जात आहे. आकोट येथील ३ संस्थेमार्फत प्रतिदिन एकूण ४00 लीटर दुधाचा पुरवठा होत असून, नोव्हेंबर महिन्यात शासकीय दूध योजनेला एकूण सरासरी २,४५७ लीटर दूध पुरवठा करण्यात आला आहे.
वाशिम जिल्हय़ात एकूण १४ दूध संस्था कार्यरत असून, यातील एका संस्थेचा दूध पुरवठा वाशिम जिल्हा दूध उत्पादक संस्थांच्या महासंघाकडून केला जात आहे. वाशिम केंद्रावर सरासरी ४,३00 लीटर प्रतिदिन दूध पुरवठा सुरू आहे. वाशिम जिल्हय़ात एकूण १९३ सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था आहेत. यातील १४४ बंद पडल्या असून, ६७ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. त्यामुळे बोटावर मोजण्याइतक्या १४ संस्था सुरू आहेत. त्यामुळे अकोला आणि वाशिम या दोन जिल्हय़ातून या शासकीय योजनेला मिळणारे दूध संकलन घटले आहे.