अकोला जिल्ह्याचा खजिना लुटला
By admin | Published: August 11, 2014 01:13 AM2014-08-11T01:13:26+5:302014-08-11T01:13:44+5:30
नव्या पोलिस अधीक्षकांना चोरट्यांची सलामी
अकोला: पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे जिल्हय़ातील जनतेची घरे सुरक्षित नाहीतच; परंतु जिल्हय़ाची मुख्य कचेरी असलेले जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. रविवारी दुपारी चोरट्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिबंधित क्षेत्र असलेले कोषागार कार्यालय फोडून पोलिसांना आव्हान दिले. कोषागार कार्यालयात २४ तास सुरक्षा तैनात असतानाही चोरट्यांनी हे कार्यालय फोडले, हे विशेष. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोषागार हा एक विभाग आहे. या विभागामध्ये कोर्ट फी मुद्रांक, तिकीट, ५00, १000 रुपयांचे मुद्रांक व जिल्हय़ातील विविध शासकीय कार्यालयांमधून येणारे कॅश बॉक्स, निवडणुकीशी संबंधित पेट्या आदी साहित्य ठेवलेले असते. कोषागार विभाग हा अत्यंत महत्त्वाचा असल्याने या ठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी कोषागार कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला; परंतु आत आणखी प्रवेशद्वार असल्याने, चोरट्यांनी या प्रवेशद्वाराचेही कुलूप फोडले आणि कोषागार कार्यालयात प्रवेश केला. या ठिकाणी असलेल्या चार कपाटे व एका लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरट्यांनी कोर्ट फी मुद्रांक व ५00, १000 रुपयांचे मुद्रांक लंपास केले. वृत्त लिहिस्तोवर चोरट्यांनी किती लाख रुपयांचे मुद्रांक आणि कॅश बॉक्समधील रोख लंपास केल्याचे कळू शकलेले नाही. घटनास्थळावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे, कोतवालीचे ठाणेदार अनिरूद्ध आढाव, अँन्टी गुंडा स्क्वॉड आदींनी पाहणी करून तपास सुरू केला. बुलडाणा येथून फिंगर प्रिंट पथकालाही पाचारण करण्यात आले होते.