अकोला जिल्हा : अवकाळी पाऊस व गारपिटीचा रब्बी पिकांना जबर तडाखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:28 AM2018-02-12T02:28:24+5:302018-02-12T02:33:37+5:30
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा बसला. सकाळी ६ वाजतापासून सुरू झालेला पाऊस दिवसभर जिल्ह्यातील वेगवेगळ्य़ा भागात सुरूच होता. या पावसामुळे सोंगणीला आलेल्या तूर, हरभरा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा बसला. सकाळी ६ वाजतापासून सुरू झालेला पाऊस दिवसभर जिल्ह्यातील वेगवेगळ्य़ा भागात सुरूच होता. या पावसामुळे सोंगणीला आलेल्या तूर, हरभरा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच गारपिटीमुळे कांदा, फळबाग व वीटभट्टी व्यवसायाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान तेल्हारा तालुक्यात झाले. दरम्यान,गारांच्या तडाख्याने अकोट तालुक्यातील एक महिलेसह मुर्तिजापूर तालुक्यातील तिघे जखमी झाले.
गत दोन-चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकर्यांवर जणू आभाळच कोसळले. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तेल्हारा तालुक्यातील दानापूर, बेलखेड, पंचगव्हाण, खंडाळा, हिंगणी बु., हिंगणी खु., तळेगाव बाजार, वडगाव, सिरसोली, रायखेड, कोंढा, शेरी, मालठाणा, सांगवी, नेर, निंबोळी, माळेगाव बाजार, हिरवखेडसह अनेक गावांत मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. बाळापूर तालुक्यात अंदुरा, कवठा बहादुरा, निंबा फाटा, बोरगाव वैराळे परिसरात गारपिटीमुळे सोंगणी करून ठेवलेल्या तुरीसह हरभरा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अकोला तालुक्यातील पळसो बढे येथे निंबाच्या आकाराची गार पडली. तसेच निपाणा, कौलखेड जहाँ., भोड, सुकोडा, खडकी, टाकळी, सिसा, मासा बोंदरखेड, डोंगरगाव या भागातही विजेच्या कडकडांटासह जोरदार पाऊस झाला.
बाश्रीटाकळी तालुक्यात सायखेड, चेलका, धाबा, कान्हेरी सरप, सोनगिरी, सिंदखेड आदी गावांमध्ये गारपीट झाली.
पातूर तालुक्यात खेट्री, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा, राहेर, अडगाव, वहाळा, सावरगाव, चान्नी, उमरा, सुकळी, चतारी, सायवणी, दिग्रस बु., सस्ती आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. यातील काही गावांमध्ये वादळी पावसासह गारपीट झाली.
अकोट तालुक्यातील आसेगाव, सावरा, मंचनपूर, कुटासा, देवरी, मुंडगाव आदी गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली.
मुर्तिजापूर तालुक्यात लाईत, दातावी, भटोरी, पारद येथे जोरदार पावसासह गारपीट झाली.
वीज कोसळून तीन जखमी
मूर्तिजापूर तालुक्यातील रसूलपूर येथे रविवारी दुपारी वीज कोसळून तीन जण जखमी झाले. रसलपूर येथे दुपारी वादळी पावसादरम्यान दुपारी वीज कोसळली. यामध्ये सुजल रवींद्र इंगळे (११), नरेंद्र माणिकराव इंगळे (३५), जितेंद्र माणिकराव इंगळे आदी जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल तायडे यांनी दिली.
नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचा पालकमंत्र्यांचा आदेश
जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्यांशी चर्चा करून ज्या गावांत पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने पंचनामे करण्याचा आदेश दिला. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकामार्फत सर्वेक्षण करून तत्काळ पंचनामे करण्यासाठीच्या कामाला लागले. प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला!
खरीप हंगामातील बोंडअळी व पावसाच्या लहरीपणाच्या संकटातून सावरलेल्या शेतकर्यांनी रब्बी पिकाची तयारी केली होती. हरभरा आणि तूर पीक काढणीसाठी तयार असताना गारपीट झाल्याने शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.
सोंगणी केलेल्या हरभरा आणि तुरीचे या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यात सोंगणीसाठी तयार असलेल्या हरभर्याच्या शेतात गारांचा ढीग साचला होता.
तालुक्यात फळबागांना फटका
तेल्हारा, अकोट तालुक्यात वादळी पावसामुळे फळबागांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला. केळी, संत्रा, निंबू आदी पिकांच्या फळबागांना गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणात फटका बसला. वीट उत्पादकांचेही या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तयार करून ठेवलेल्या कच्च्या विटा पाण्यात विरघळल्या. त्यामुळे वीट उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सिरसो, पुनोती खुर्द येथे वीज कोसळली!
वादळी पावसादरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने यामध्ये प्राणहानी झाली नाही. वीज कोसळल्याने नारळाच्या झाडाला आग लागली होती. ही आग ग्रामस्थांनी विझवली. बाश्रीटाकळी तालुक्यातील पुनोती खुर्द येथे झाडावर वीज कोसळली. शेत शिवारात वीज कोसळल्याने नुकसान टळले.
पावसाची रिपरिप सुरूच!
जिल्ह्यात सकाळी झालेला पाऊस दिवसभर जिल्ह्यातील विविध भागात सुरूच होता. बाळापूर शहरात सायंकाळी ७ वाजता गारपीट झाली, तर वझेगाव येथे सायंकाळी पंधरा मिनिटांपर्यंत गारपीट, बोरगाव वैराळे, नया अुंदरा, कारंजा रमजानपूर व परिसरात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. वादळी वार्यासह पाऊस झाल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.