अकोला जिल्ह्यात पावसाचा खंड! : शेतकऱ्यांनी सध्या पेरणी करू नये - कृषी विद्यापीठाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 02:11 PM2018-06-16T14:11:00+5:302018-06-16T14:11:00+5:30
अकोला : अकोला जिल्ह्यात १५ जूनपासून पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, कमाल तापमान ३७ अं.से. ते ३९ अं.से.पर्यंत राहील व किमान तापमान २६ अं.से. ते २७ अं.से. पर्यंत राहील व तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी सद्यपरिस्थितीत पेरणी करू नये, असे आवाहन डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने केले आहे.
वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यात २ ते १२ जून दरम्यान झालेल्या समाधानकारक पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे, तसेच ज्या ठिकाणी शेतकरी बंधंूनी पेरणी आटोपली आहे त्या ठिकाणी आपल्या परिसरात पडलेला पाऊस, जमिनीतील ओलावा, उपलब्ध पाण्याचा स्रोत याचा अंदाज घेऊन पिकाला ताबडतोब संरक्षित पाणी द्यावे व ज्या ठिकाणी पाऊस कमी पडला आहे तेथे उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत, शेताची पुढील पीक नियोजनानुसार ताबडतोब मशागत करावी. शेतातील पिकांचे अवशेष वेचून घ्यावेत आणि ते जाळून न टाकता त्यांचा कंपोस्ट खत करण्यासाठी उपयोग करावा. रासायनिक खताचा वापर माती नमुना तपासणीच्या परिक्षणानुसारच करावा, असाही सल्ला देण्यात आला.