अकोला जिल्ह्याचा दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:54 PM2019-06-09T13:54:18+5:302019-06-09T13:54:23+5:30

अकोला : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा अकोला जिल्ह्याचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी घसरला आहे.

 Akola district results dropped by 12 percent | अकोला जिल्ह्याचा दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला!

अकोला जिल्ह्याचा दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला!

Next

अकोला : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा अकोला जिल्ह्याचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी घसरला आहे. शिक्षण विभागाने यावर्षीपासून बंद केलेले प्रात्यक्षिकाचे गुण आणि शाळांच्या हातात असलेले विषयांचे प्रत्येकी २0 गुण बंद केल्यामुळे निकाल घसरल्याचे शिक्षण तज्ज्ञ सांगत आहेत.
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८२.२५ टक्के एवढा लागला होता; परंतु ८ जून रोजी जाहीर झालेल्या शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या निकालाची टक्केवारी ७0.८२ टक्क्यांवर आली आहे. वर्षभरात दहावीचा निकाल तब्बल १२ टक्क्यांनी घसरला आहे. अमरावती विभागात अकोला चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. जिल्ह्याची नव्हे तर सात तालुक्यांची टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. निकाल घसरण्यामागची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न शाळांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये तब्बल ७ हजार ८७६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी ५ हजार ४१६ विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण झाले होते. यंदा दहावी निकालात जिल्ह्यात अकोट तालुका माघारला. अकोट तालुक्याचा निकाल ६४.९१ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ तेल्हारा ६८.१३ टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल ७४.९३ टक्के पातूर तालुक्याचा आणि ७३.२५ टक्के निकाल अकोला तालुका तर ७१.३७ टक्के निकाल मूर्तिजापूर तालुक्याचा लागला आहे. गतवर्षीपर्यंत सर्वच विषयात प्रात्यक्षिकाचे गुण दिले जात होते; परंतु यावर्षीपासून हे गुण केवळ गणित व विज्ञान या विषयांपुरते मर्यादित करण्यात आले. त्याचा परिणाम निकालाच्या टक्केवारीवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय आठवीपर्यंत कुणालाही नापास न करण्याचा निर्णय, कॉपीमुक्ती अभियान, दहावीत विद्यार्थ्यांना लागणारे उच्च शिक्षणाचे वेध, दहावीतच या उच्च शिक्षणाची सुरू झालेली तयारी, त्यामुळे दहावीच्या अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, मोबाइलचा वाढलेला वापर आदी कारणांमुळेही निकालाची टक्केवारी घसरली असल्याचे सांगण्यात येत आहे.


मायमराठीत मागे, इंग्रजीत पुढे!
यंदा बोर्डाच्या निकालामध्ये मराठी विषयामध्ये विद्यार्थी माघारल्याचे दिसून आले. विभागात मराठी विषयाचा निकाल केवळ ७२.३१ टक्के लागला तर इंग्रजी विषयाचा निकाल सर्वाधिक ९६.२८ टक्के लागला. यावरून माध्यमिक शालेय विद्यार्थी मायमराठी भाषेतच कच्चे पडत असल्याचे दिसून येत आहे. संस्कृत विषयाचा ९५ टक्के, हिंदी विषयाचा ६८.१९ टक्के निकाल लागला आहे. मराठी विषयामध्ये मराठी मुलेच माघारत असल्याचे चिंताजनक चित्र निकालाच्या टक्केवारीतून दिसून येते.

खासगीत मॅट्रिकची परीक्षा देणारे ४१ जण उत्तीर्ण!
अनेकांना शाळेत जाऊन तासिकांना बसणे शक्य होत नाही. त्यामुळे काही जण खासगीत मॅट्रिकचा फॉर्म भरुन परीक्षेला बसतात. यंदा खासगीत दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून १0३ जण बसले होते. त्यापैकी ४१ जणांनी यश प्राप्त केले. दोघे प्राविण्यश्रेणीत, आठ जण प्रथमश्रेणीत तर २२ जण द्वितीय श्रेणीत पास झाले.

 

Web Title:  Akola district results dropped by 12 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.