अकोला जिल्ह्यातील शिक्षकाने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे बनविला लघुपट!
By atul.jaiswal | Published: May 2, 2018 02:18 PM2018-05-02T14:18:14+5:302018-05-02T14:19:23+5:30
अकोला : शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळाले, तर ते शाळेकडे आकृष्ट होतात, असा संदेश देणारा लघुपट अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने बनविला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : शाळेला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळाले, तर ते शाळेकडे आकृष्ट होतात, असा संदेश देणारा लघुपट अकोला जिल्ह्यातील गोपालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने बनविला आहे. संघदास भगवान वानखडे असे या शिक्षकाचे नाव असून, त्यांनी मोबाइल फोनच्या कॅमेराद्वारे हा २२ मिनिटांचा लघुपट तयार केला आहे.
मुलांना जे आवडते, त्या आवडीच्या माध्यमातून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्याचा परिणाम चिरकाल टिकतो, असा संदेश ‘सालस’ नामक या लघुपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या लघुपटाचे चित्रिकरण गोपालखेड गावात झाले असून, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन व छायाचित्रण संघदास वानखडे यांनी केले आहे. शाळेला नेहमी दांडी मारणारा विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रेमळ वागणुकीतून शाळेकडे कसा वळतो, हे दाखविण्याचा प्रयत्न या लघुपटात करण्यात आल्याचे संघदास वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या चित्रपटात हर्षल जाधव, निशांत गायकवाड या विद्यार्थ्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. शिवाय माजी जि.प. सदस्य प्रदीप देशमुख, शाळेतील शिक्षिका जयश्री जोशी, मीनाक्षी आपटे, धनराज ठाकरे, श्याम देवकर व संघदास वानखडे यांनीही काम केले आहे. या लघुपटासाठी गोपालखेड केंद्रातील सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे.
शिक्षकाने बनविलेला राज्यातील दुसराच लघुपट
एखाद्या शिक्षकाने शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोबाइल कॅमेराद्वारे लघुपट बनविण्याचा हा राज्यातील दुसरा प्रयत्न असल्याचा दावा संघदास वानखडे यांनी केला आहे. यापूर्वी सांगली येथील प्रवीण डाकरे या शिक्षकाने २०१७ मध्ये ‘लेजीम’नावाचा लघुपट बनविला होता. संघदास वानखडे यांनी बनविलेला हा लघुपट ‘कोकण फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’, चिपळूण, रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित ‘इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’साठी हा लघुपट पाठविण्यात येणार आहे.