अकोला जिल्हा : शौचालये बांधली, पण वापरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:49 AM2017-12-20T01:49:22+5:302017-12-20T01:50:17+5:30

अकोला : ‘जहाँ सोच वही शौचालय’ नारा देत ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठीचे उद्दीष्ट्ये संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तथापि अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम केले जात असून, त्या शौचालयांचा वापर काही ग्रामस्थ जळतन व इतर घरगुती साहित्य ठेवण्यासाठी करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले. 

Akola District: Toilets built, but not used! | अकोला जिल्हा : शौचालये बांधली, पण वापरच नाही!

अकोला जिल्हा : शौचालये बांधली, पण वापरच नाही!

Next
ठळक मुद्देउदासीनता : जिल्ह्यात अनेक शौचालयांचा वापर केला जातो साहित्य ठेवण्यासाठीस्टिंग ऑपरेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘जहाँ सोच वही शौचालय’ नारा देत ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठीचे उद्दीष्ट्ये संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तथापि अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम केले जात असून, त्या शौचालयांचा वापर काही ग्रामस्थ जळतन व इतर घरगुती साहित्य ठेवण्यासाठी करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले. 
ग्रामीण भागामध्ये गावे हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात जिल्हाभरात अनेक ठिकाणी दर्जाहीन शौचालयांची निर्मिती होत आहे. एवढेच नव्हे, तर सरकारी अधिकारी आणि कर्मचारी शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कागदावर शौचालये बांधण्यात येत असली, तरी अनेक गावांमध्ये त्याचा वापरच होत नसल्याचे धक्कादायक चित्र  जिल्ह्यातील ४0 गावांमध्ये समोर आले आहे. ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता अजूनही बदलली नसल्याचे शौचालये बांधलेली असूनही ग्रामस्थ उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. तसेच बांधलेल्या शौचालयांचा वापर साहित्य ठेवण्यासाठी, स्नानगृहांसाठी तर कुठे कुठे चक्क  कोंबड्या ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. 
अकोटमध्ये सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी २१ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला, तरीही शौचालयांची बिकट अवस्था कायम असल्याचे आढळले. बाळापुरात उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाभार्थींचे कागदपत्रेही पाहण्यात आले नाही. शहरात अतिक्रमित जागांवरही शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आगरसह परिसरातील आठ गावांमध्ये शौचालये शो पीस असल्याचे आढळले. वाडी अदमपूरमध्ये शौचालयांचा वापर केवळ अनुदान लाटण्यासाठी केला जात असल्याचे चित्र आहे. व्याळा येथे ४0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामस्थ अजूनही उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. चोहोट्टा बाजार येथे कागदावर शौचालये पूर्ण झाली असल्याचे दाखवण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती गंभीर आहे. अनेकांकडे शौचायचे नसल्याचे समोर आले. मुंडगावात ६0 टक्के शौचालयांची कामे अर्धवट आहेत. तळेगावात खासगी कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे शौचालये पुरवण्यात येत आहेत. हिवरखेडमध्ये १४00 लाभार्थींची यादी मंजूर असली तरी ७00 पेक्षा कमी लाभार्थींनी प्रत्यक्षात शौचलये बांधली आहेत.
 पिंजरपासून जवळच असलेल्या वडगाव येथे केवळ एका सिमेंटच्या बोरीमध्ये संपूर्ण शौचालयांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा दर्जाचा विचार न केलेला बरा. डोंगरगाव परिसरात अनेक शौचालयांची छतच गायब असल्याचे आढळले. तसेच काही शौचालयांमध्ये अडगळीतील साहित्य ठेवण्यात येत आहे. 
वल्लभनगर परिसरात अनेक शौचालये कागदावरच पूर्ण दाखवण्यात आली आहे. शिर्ला, लोहारा, निंबा फाटा, वाडेगाव, सायखेड व परिसरातील आठ गावांमध्ये अनेक ग्रामस्थ शौचालयांचा वापरच करीत नसल्याचे चित्र आहे. मधापुरीत अनेक शौचालयांना छतच नसल्याचे चित्र आहे. 

जुन्याच शौचालयांवर लाटले अनुदान!
लोहारासह  येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिळणारे अनुदान लाटण्यासाठी जुनेच शौचालय दाखवण्यात आले, तर व्याळा येथे २0१५ पूर्वी शौचालय बांधल्यानंतर देण्यात येणार्‍या प्रोत्साहन निधीत मोठा घोळ झाला आहे.निंभोरा येथे ५0 टक्के शौचालयांचेच काम पूर्ण करण्यात आले आहेत. अकोटात अनेक सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे. 

ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालयही बंद 
ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशनचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावरही टाकण्यात आली आहे; मात्र सिरसोली ग्रामपंचायतच्या कार्यालयात असलेले शौचालयच वापरात नसल्याचे चित्र आहे. पाइप व इतर साहित्य या शौचालयात ठेवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी शौचालयांचा वापर जळतन ठेवण्यासाठी, इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. 

Web Title: Akola District: Toilets built, but not used!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.