एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमात अकोला जिल्हा राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:23 AM2021-04-24T11:23:53+5:302021-04-24T11:25:26+5:30
Akola district tops state in HIV AIDS control program: एचआयव्ही बाधित गर्भवती माता व त्यांच्या बालकांची तपासणी व औषधोपचार सुविधा, अशा निर्देशकात अकोला जिल्हा राज्यात प्रथम स्थानी आला आहे.
अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला. त्यामुळे आरोग्य विभागाचे विविध कार्यक्रमही प्रभावित झाले, मात्र गत वर्षभरात एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्हा कार्यालयांतर्गत एक लाख ३१ हजार व्यक्तींची एचआव्ही चाचणी करण्यात आली. यामध्ये १६१ जणांचे अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह असून, यामध्ये ९ गर्भवती मातांचाही समावेश आहे. तपासणीचा हा आकडा राज्यात सर्वाधिक असल्याचे राज्यस्तरीय आढाव्यातून समोर आले. त्यानुसार अकोला जिल्हा एचआयव्ही एड्स कार्यक्रमात अव्वलस्थानी असल्याचे घोषित करण्यात आले आहे. एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यात ५७ तपासणी केंद्र कार्यरत आहेत. तसेच दोन औषधोपचार केंद्र, दोन गुप्तरोग सुविधा केंद्र, तीन अशासकीय संस्था आहेत. या सर्वच यंत्रणेच्या माध्यमातून कोरोनाच्या प्रादुर्भावात एचआयव्ही चाचण्यांची मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत गत वर्षभरात जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये १६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये नऊ गर्भवती मातांचा समावेश आहे. कोविड काळात एचआयव्ही प्रतिबंधात्मक सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे मोठे आव्हान होते. त्यातून मार्ग काढत जिल्ह्यातील विविध केंद्रांनी व अशासकीय संस्थांच्या सहकार्याने एचआयव्ही चाचण्यांचा हा टप्पा गाठता आला. एचआयव्ही एड्स कार्यक्रमांतर्गत तपासणीचे उद्दिष्ट, एचआयव्ही बाधित रुग्णांच्या औषधोपचाराची नाेंद, एचआयव्ही बाधित गर्भवती माता व त्यांच्या बालकांची तपासणी व औषधोपचार सुविधा, अशा निर्देशकात अकोला जिल्हा राज्यात प्रथम स्थानी आला आहे.
१३ बालकांची ‘ईआयडी’ तपासणी
कोरोना काळात ६ एचआयव्ही बाधित गर्भवतींची प्रसूती झाली असून, अशा सर्वच बालकांची ईआयडी कार्यक्रमांत नोंद करण्यात आली. तसेच गत १८ महिन्यात १३ बालाकंची ईआयडी तपासणी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्याने १०० टक्के बालकांची तपासणी पूर्ण केली आहे.
नियमित आढावा, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा परस्पर समन्वय व अशासकीय संस्थांचा सहभाग यामुळे अकोला जिल्हा राज्यात प्रथम आला आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला